म्हसळा अत्याचार प्रकरणी नराधमास १० वर्षे सश्रम कारावास; माणगाव न्यायालयाचा निकाल, पोलिसांच्या पाठपुराव्याला यश
व्हिजन २४ तास न्यूज
सुशील यादव : म्हसळा रायगड
म्हसळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला माणगाव येथील विशेष न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. निलेश बाबुराव दुर्गावले असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून, न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निकाल २८ ऑगस्ट २०२६ रोजी दिला.
* गुन्ह्याचा तपास आणि कारवाई:

तत्कालीन पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, तत्कालीन अपर पोलीस अधीक्षक श्री. झेंडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास करण्यात आला. प्रभारी पोलीस अधिकारी संदीपान सोनवणे यांच्या देखरेखीखाली पोलीस उपनिरीक्षक बांडे यांनी सखोल तपास करून न्यायालयात सबळ पुराव्यांसह दोषारोपपत्र दाखल केले. तपासकामी पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई सांगळे आणि महिला पोलीस शिपाई वर्षा पाटील यांनी मोलाची भूमिका बजावली.

* न्यायालयीन पाठपुरावा आणि युक्तिवाद:
विशेष न्यायालयात सरकारी अभियोक्ता ॲड. योगेश तेंडुलकर यांनी सरकार पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडली. सध्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली खटल्याच्या कामकाजाचा प्रभावी पाठपुरावा करण्यात आला. या प्रक्रियेत माणगाव न्यायालयातील कोर्ट कारकून पोलीस हवालदार कासार यांनी समन्वय साधत दोषसिद्धीसाठी महत्त्वाची मदत केली.

रायगड पोलीस दल आणि म्हसळा पोलिसांनी केलेल्या भक्कम तपासामुळे पीडितेला अखेर न्याय मिळाला असून, या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

