माण पंचायत समितीच्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्याची आत्महत्या; वरकुटे-मलवडीत शोककळा

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

माण पंचायत समिती, दहिवडी येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत असलेले वरकुटे-मलवडी (ता. माण) येथील आकाश बाबासाहेब सरतापे (वय ३४) यांचा राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. रविवारी (दि. २७) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे वरकुटे-मलवडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आकाश सरतापे हे गेल्या पाच वर्षांपासून माण पंचायत समिती, दहिवडी येथे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता म्हणून कार्यरत होते. रविवारी सुटी असल्याने ते वरकुटे-मलवडी येथील आपल्या घरी होते. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घरातील बेडरूमचा दरवाजा बंद असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने खिडकीतून पाहिले असता आकाश हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

या घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी त्यांचे भाऊ निहाल सरतापे यांनी पोलिसांना माहिती दिली. म्हसवड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून,सपोनि संदिप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जे. डी. लुबाळ पुढील तपास करीत आहेत.

आकाश सरतापे यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *