उपकेंद्र गारवडला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाचा बहुमान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

सोलापूर प्रतिनिधी (इम्रान मुल्ला) 

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्ता, रुग्णसुरक्षा, स्वच्छता, व्यवस्थापन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांची काटेकोर तपासणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) प्रदान केले जाते. या राष्ट्रीय स्तरावरील मानांकनात सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्यातील आणखी ७ आयुष्मान आरोग्य मंदिरांना (AAM) NQAS मानांकन प्राप्त झाले आहे.

यामध्ये आयुष्मान आरोग्य मंदिर, गारवड याचाही समावेश असून, गारवडच्या आरोग्य केंद्राने गुणवत्ता आणि रुग्णसेवेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत हा बहुमान मिळविला आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच अधिक दर्जेदार, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे.

सोलापूर जिल्ह्यात NQAS मानांकन प्राप्त करणाऱ्या नव्या सात आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये बेंबळे, उलेगाव, गारवड, गार्डी, सदाशिवनगर, पिसेवाडी आणि भटुंबरे या उपकेंद्रांचा समावेश आहे. या नव्या यशामुळे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ४४ आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकनाचा बहुमान मिळाला आहे.

NQAS मानांकनामुळे आरोग्य संस्थांमधील सेवा वितरण अधिक सक्षम होण्याबरोबरच रुग्ण सुरक्षा, औषध व वैद्यकीय उपकरणांचे व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन, स्वच्छता आणि रुग्णांच्या समाधानात सुधारणा होण्यास मदत होते. तसेच मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत प्रोत्साहन निधी मिळण्याची पात्रता प्राप्त होते. या निधीचा उपयोग पायाभूत सुविधा, वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णसुविधा अधिक बळकट करण्यासाठी करता येतो.

या उल्लेखनीय यशामागे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर, जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव आणि जिल्हा समन्वयक निखिल फताटे यांच्या नेतृत्वाखालील टीमचे अथक प्रयत्न आहेत.

तसेच तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रियांका शिंदे, मानकी वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश शिंगाडे, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पूजा केमकर, आरोग्य सेविका मदिना मुलानी, आरोग्य सेवक संकेत लवटे व सुनील साठे, आरोग्य सेविका पुनम माळी, तसेच सर्व CHO, आशा स्वयंसेविका स्वप्नाली करडे, सोनिया लोंढे, काजल भिसे, लक्ष्मी मगर, शैनाज सय्यद, मदतनीस आलका करडे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मानकी अंतर्गत सर्व कर्मचारी यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे फलित असल्याचे सांगण्यात आले.

या कामगिरीबद्दल संबंधित अधिकारी, कर्मचारी, CHO आणि आशा स्वयंसेविकांचे अभिनंदन करण्यात आले. जिल्ह्यातील उर्वरित आरोग्य संस्थांनीही NQAS मानांकन मिळविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

चौकट

जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना NQAS मानांकन मिळवून देण्याचा मानस

“आजपर्यंत जिल्ह्यातील ४४ आरोग्य संस्था NQAS मानांकनासाठी पात्र ठरल्या आहेत. भविष्यात जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील. जनतेला दर्जेदार, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.”

– कुशल जैन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *