१५ वर्षांच्या संघर्षानंतर रोहित कलढोणेंचे यश; तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा – सपोनि संदिप पोमण
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
अहिंसा नागरी सहकारी पतसंस्थेत जीएसटी अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल श्री. रोहित नंदकुमार कलढोणे यांचा सत्कार म्हसवड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप पोमण यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी, म्हसवड नगरपरिषदेचे आरोग्य सभापती विजय शेठ बनगर, नगरसेवक महावीर विरकर तसेच ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सत्कार प्रसंगी बोलताना सपोनि संदिप पोमण म्हणाले, “रोहित कलढोणे यांच्या काही संधी दुर्दैवाने हुकल्या; मात्र त्यांनी निराश न होता सातत्याने राज्यसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. तब्बल १५ वर्षांच्या संघर्षानंतर त्यांनी यश मिळविले. आजच्या तरुण पिढीने त्यांच्या जिद्द, चिकाटी आणि संयमाचा आदर्श घ्यावा.”
पुढे बोलताना पोमण म्हणाले की, एखाद्या परीक्षेत किंवा प्रयत्नात अपयश आले की आजच्या पिढीतील काही तरुण नैराश्याला बळी पडतात. अशा वेळी रोहित कलढोणेंचा संघर्ष प्रेरणादायी आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून सिद्ध केले आहे. त्यांच्या यशामागे कुटुंबीयांनी गेली १५ वर्षे दिलेली भक्कम साथही कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार आण्णासाहेब टाकणे म्हणाले की, अहिंसा पतसंस्थेने गेल्या २५ वर्षांपासून समाजातील उल्लेखनीय आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्याची दखल घेत संबंधितांचा सन्मान करण्याचा वसा जपला आहे. रोहित कलढोणे यांचे कुटुंब अध्यात्मिक संस्कारांचे असून, वडिलांच्या मार्गदर्शन व कुटुंबीयांच्या साथीने त्यांनी हे यश संपादन केले आहे.
नगरसेवक महावीर विरकर यांनी रोहित कलढोणे यांच्या यशाचे कौतुक करताना, “त्यांच्या यशाने म्हसवडच्या वैभवात भर पडली असून, त्यांच्या कर्तृत्वाचा म्हसवडकरांना अभिमान आहे,” असे गौरवोद्गार काढले.
अहिंसा पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगराध्यक्ष नितीनभाई दोशी म्हणाले की, रोहित कलढोणे यांनी गेली १५ वर्षे न थकता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास व प्रयत्न सुरू ठेवले. अनेकदा संधीने हुलकावणी दिली, मात्र त्यांनी हार मानली नाही. त्यामुळे त्यांच्या आजच्या यशाला संघर्ष, जिद्द आणि चिकाटीची किनार आहे. जीएसटी अधिकारी म्हणून देशाच्या विकासात योगदान देण्याची संधी त्यांना मिळाली असून, हीदेखील देशसेवेचीच एक प्रकारे संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी संचालक महावीर व्होरा, सुजय दोशी, नंदकुमार कलढोणे, सागर वेदपाठक, सागर पोरे, अझर मुजावर, पप्पू बाबर, राजू शहा यांच्यासह अहिंसा पतसंस्थेचे अधिकारी-कर्मचारी व म्हसवडमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले.

