सिद्धनाथ हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिनानिमित्त विद्यार्थ्यांत वाहतूक नियमांची जनजागृती

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड (प्रतिनिधी) :

आंतरराष्ट्रीय वाहतूक सिग्नल दिनानिमित्त सिद्धनाथ हायस्कूल, म्हसवड येथे विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. वाहतूक सिग्नलचे महत्त्व, रस्ते सुरक्षा आणि नियमांचे पालन याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी कु. साक्षी मेंढापुरे आणि कु. श्रावणी लोखंडे यांनी तयार केलेल्या विविध वाहतूक सिग्नलच्या आकर्षक पोस्टर्सचे अनावरण विद्यालयाचे प्राचार्य श्री. दासरे सर यांच्या हस्ते करण्यात आले.

मार्गदर्शन करताना प्राचार्य दासरे यांनी वाहतूक सिग्नल, रस्त्यावरील मार्गदर्शक सूचना आणि त्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. शाळेत येताना-जाताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

उपमुख्याध्यापक श्री. भोसले सर यांनी पदचाऱ्यांसाठी असलेल्या नियमांची सविस्तर माहिती दिली. तसेच वाहन चालवण्याचा परवाना नसताना वाहन चालवणे हा कायद्याचा भंग असून त्यातून होणारे अपघात व इतर गंभीर परिणाम विद्यार्थ्यांना उदाहरणांसह समजावून सांगितले.

कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या वाहतूक सिग्नलच्या पोस्टर्सचे निरीक्षण केले. विविध सिग्नल, त्यांचे अर्थ आणि प्रत्यक्ष जीवनातील उपयोग याविषयी शिक्षकांकडून माहिती घेतली.

या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ते सुरक्षा याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *