तारळेचा पूल गेला वाहून; २५ गावांचा संपर्क तुटला! ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते
तारळे (प्रतिनिधी) :
सलग तीन दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसाने तारळे परिसराला मोठा फटका बसला असून तारळे येथील पूल वाहून गेल्याने तब्बल २५ गावांचा संपर्क तुटला आहे. पर्यायी मार्गाची व्यवस्था नसल्याने शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी, नोकरदार आणि चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. या परिस्थितीमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पुलाच्या पलीकडील अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शेतीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. आधीच अतिवृष्टीचा फटका सहन करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता शेतात जाण्याचाही प्रश्न निर्माण झाला असून पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, नवीन पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत जुना पूल पाडण्यात येऊ नये, अशी मागणी वारंवार करण्यात आली होती. काही ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी सातत्याने पाठपुरावाही केला. मात्र, या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. आता पूल वाहून गेल्यानंतर २५ गावांतील नागरिकांना त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याने संताप अधिकच वाढला आहे.

नवीन पुलाच्या कामासाठी अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. मात्र, काही शेतकऱ्यांना अद्यापही योग्य मोबदला मिळालेला नसल्याची तक्रार आहे. एकीकडे जमीन गेली, दुसरीकडे मोबदला मिळाला नाही आणि आता गावांचा संपर्कही तुटला, अशी संतप्त भावना बाधित शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

पूल वाहून गेल्याने दैनंदिन व्यवहार पूर्णपणे विस्कळीत झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, नोकरदारांच्या कामावर जाण्याचा, शेतकऱ्यांच्या शेतीकामांचा तसेच अत्यावश्यक सेवांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, नवीन पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करावे आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसह प्रलंबित मोबदला त्वरित द्यावा, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारामुळे तारळे परिसरात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी करावी व अडचणीत सापडलेल्या नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

चौकट : ‘पर्यायी व्यवस्था नेमकी कधी?’

“२५ गावांचा संपर्क तुटला, शेतीचे नुकसान झाले, विद्यार्थी आणि नागरिक अडचणीत आले. अशा परिस्थितीत पर्यायी वाहतूक व्यवस्था नेमकी कधी होणार? तसेच पुलाच्या कामासाठी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा हक्काचा मोबदला कधी मिळणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *