मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील टीकेचे म्हसवडमध्ये तीव्र पडसाद; भाजपकडून खा. संजय राऊत यांच्या पुतळ्याचे दहन
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावरील कथित आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ म्हसवड येथे भाजप व जयकुमार गोरे समर्थकांनी आक्रमक आंदोलन करत खासदार संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी सुमारे तासभर रस्ता रोको आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनाची सुरुवात एस.टी. बसस्थानक चौकात करण्यात आली. महिला नगरसेविका व भाजप कार्यकर्त्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला साडी-चोळी नेसवून निषेध व्यक्त केला. त्यानंतर पुतळ्याला चपलांचा हार घालून दहन करण्यात आले. “संजय राऊत हाय हाय”, “संजय राऊत यांचा निषेध असो”, “जय श्रीराम” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
यावेळी भाजप नेते डॉ. प्रमोद गावडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध नोंदवत, मंत्री जयकुमार गोरे यांच्याविषयी यापुढेही अवमानकारक भाषा वापरल्यास भाजप कार्यकर्ते गप्प बसणार नसल्याचा इशारा दिला.
नगराध्यक्षा पूजा वीरकर यांनी लोकप्रतिनिधींनी सार्वजनिक जीवनात बोलताना सभ्यता व संयम राखावा, असे सांगत मंत्री गोरे यांच्यावरील खालच्या पातळीवरील टीकेचा निषेध केला.
उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे यांनी ग्रामीण विकासासाठी जयकुमार गोरे यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख करत, अशा प्रकारचे वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगितले.
माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकासातील कामांचा उल्लेख करत, सातत्याने बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच एसी खोलीत बसून टीका करण्यापेक्षा माण-खटावमध्ये येऊन विकासकामे पाहावीत, असे आव्हान त्यांनी दिले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत, यापुढे वैयक्तिक टीका सहन केली जाणार नाही आणि जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.
आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. मात्र म्हसवड पोलिसांनी योग्य बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या आंदोलनात नगराध्यक्ष पूजा वीरकर, उपनगराध्यक्षा श्रीदेवी पिसे, माजी नगराध्यक्ष नितीन दोशी,नगरसेवक अकील काझी,डॉ. प्रमोद गावडे, माण-खटाव लाडकी बहीण अध्यक्ष आप्पासाहेब पुकळे, सचिन वीरकर, निशांत पिसे, आप्पासाहेब वीरकर, हणमंत रांखुडे, रत्नदीप शेटे, बंटी माने, डॉ. वसंत मासाळ, सोमनाथ केवटे, धनाजी शिंदे, बाळासाहेब पिसे यांच्यासह भाजप पदाधिकारी, महिला नगरसेविका, कार्यकर्ते व जयकुमार गोरे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

