पक्ष संघटन बळकट करा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
शिवसेना शेतकरी सेनेचे संघटन गावागावांत अधिक सक्षम करण्यासाठी कार्यकर्त्यांनी समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन काम करावे. पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी शासन व पक्षस्तरावर आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते नामदार एकनाथ शिंदे यांनी शेतकरी सेनेच्या शिष्टमंडळाला दिली.
मुंबई येथील ‘नंदनवन’ या शासकीय निवासस्थानी शिवसेना शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष कृषिरत्न प्रा. विश्वंभर बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज्यातील शेतकरी प्रश्न, संघटन विस्तार तसेच पक्षाच्या कार्यपद्धतीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी प्रा. विश्वंभर बाबर यांनी लेखी निवेदन सादर करून, शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सामाजिक तसेच राजकीय कामांना अधिक गती मिळावी यासाठी मुंबई येथील बाळासाहेब भवन येथे ठराविक कालावधीनंतर शिवसेनेच्या मंत्र्यांसोबत पदाधिकारी-कार्यकर्ता संवाद बैठक आयोजित करण्यात यावी, अशी मागणी केली.
तसेच म्हसवड नगरपरिषदेच्या विविध विकासकामांसह माण तालुक्यातील प्रलंबित प्रश्न आणि विकास आराखड्याबाबतही त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याशी चर्चा केली. राज्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवसेना शेतकरी सेनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहितीही या वेळी शिष्टमंडळाने दिली.
यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी सेनेच्या कार्याचे कौतुक करत, “पक्ष संघटन अधिक बळकट करा, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचा. मी कायम तुमच्या पाठीशी आहे,” असा विश्वास पदाधिकाऱ्यांना दिला.
या प्रसंगी शेतकरी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष नाथराव कराड (बीड), महेश शेडगे, आदित्य रांजणकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

