वारकऱ्यांच्या सेवेत विधाता सामाजिक संस्थेचा आदर्श उपक्रम; मोफत औषधोपचार व अल्पोपहाराचा हजारो भाविकांना लाभ
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी विधाता सामाजिक संस्था, म्हसवड, प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड आणि पुलकोटी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार तसेच चहा, बिस्किटे व भडंगाचा अल्पोपहार वाटपाचा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या सेवाभावी उपक्रमाचा हजारो वारकऱ्यांनी लाभ घेत संस्थेच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

गेल्या १५ वर्षांपासून विधाता सामाजिक संस्था विविध सामाजिक, आरोग्य व जनहिताचे उपक्रम सातत्याने राबवत असून समाजात विश्वासार्ह व सेवाभावी संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सातारा, पुसेगाव, गोंदवले आदी मार्गांवरून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भव्य स्वागत मंडप उभारण्यात आला. वारकऱ्यांना विश्रांतीची सुविधा उपलब्ध करून देत त्यांची आरोग्य तपासणी, आवश्यक औषधोपचार तसेच चहा, बिस्किटे आणि भडंगाचे मोफत वाटप करण्यात आले.

या आरोग्य शिबिरात प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवडचे वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. मोहन कोडलकर, डॉ. पूनम पुजारी तसेच पुलकोटी येथील डॉ. बालाजी जेडगे, डॉ. प्रतीक्षा पालवे, डॉ. वीरकर मॅडम, रावसाहेब लिटे आणि त्यांच्या सर्व कर्मचारीवर्गाने वारकऱ्यांची तपासणी करून आवश्यक औषधोपचार केले. आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेऊन रुग्णवाहिकेची (ॲम्ब्युलन्स) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती.

यावेळी म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, नगरपरिषदेचे सर्व नगरसेवक, नामदेव समाज परिषदेचे सातारा जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे, माजी केंद्रप्रमुख जगन्नाथ विरकर, कृषिरत्न विश्वंभर बाबर, ॲड. विलास गायकवाड, सपोनि संदीप पोमन, पत्रकार सुशील त्रिगुणे, विजय चांडवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून उपक्रमाचे कौतुक केले आणि आयोजकांचे अभिनंदन केले.

वारकऱ्यांची सेवा हीच खरी विठ्ठल सेवा मानत, कोणतीही अपेक्षा न ठेवता गेली १५ वर्षे सातत्याने राबविण्यात येणारा हा उपक्रम समाजापुढे सेवाभावाचा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे. विधाता सामाजिक संस्थेच्या या कार्यामुळे वारकऱ्यांना मोठा आधार मिळत असून, समाजहितासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

