ओकिनावा मार्शल आर्ट अकॅडमीच्या बेल्ट परीक्षेत कष्ट, शिस्त आणि जिद्दीचा गौरव; मान्यवरांकडून अभिनंदन
व्हिजन २४ तास न्यूज
गोंदवले खुर्द, प्रतिनिधी :
गोंदवले खुर्द येथे ओकिनावा मार्शल आर्ट अकॅडमीच्या वतीने आयोजित कराटे बेल्ट परीक्षा उत्साहात पार पडली. आत्मसंरक्षण, शिस्त आणि आत्मविश्वासाचा संदेश देणाऱ्या या परीक्षेत गावातील विद्यार्थी वसीम शेख याने उत्कृष्ट कामगिरी करत ब्राऊन बेल्ट पटकावला. त्याच्या या यशामुळे गोंदवले खुर्दमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक १२ जुलै २०२६ रोजी झालेल्या या परीक्षेस ग्रँडमास्टर आप्पा जाधव (ब्लॅक बेल्ट सिक्स्थ डॅन), विनोद माटे (ब्लॅक बेल्ट थर्ड डॅन), विजयकुमार अवघडे (ब्लॅक बेल्ट सेकंड डॅन), सादिक शेख (ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन) आणि आदिनाथ शिंदे (ब्लॅक बेल्ट फर्स्ट डॅन) यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते वसीमला ब्राऊन बेल्ट प्रदान करण्यात आला.
वसीमच्या यशामागे त्याची मेहनत, शिस्त, चिकाटी तसेच कुटुंबीयांचे प्रोत्साहन आणि गुरूंचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. आई ॲड. करिश्मा शेख, वडील सादिक शेख, आजोबा दादासाहेब शेख यांच्यासह संपूर्ण कुटुंबाने त्याला दिलेल्या पाठबळामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
ग्रँडमास्टर आप्पा जाधव यांनी वसीमचे विशेष कौतुक करत, “वसीमसारखे संस्कारक्षम, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थीच गावाचे नाव उज्ज्वल करतात,” असे गौरवोद्गार काढले.
कार्यक्रमाला गोंदवले खुर्दचे माजी सरपंच अजितराव पोळ यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी वसीमचे अभिनंदन करून भविष्यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अजिंक्य अवघडे, प्रेरणा, समीक्षा, सर्व प्रशिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“ब्राऊन बेल्ट हा केवळ एक रंग नसून शिस्त, जिद्द, कष्ट आणि आत्मविश्वासाचा सन्मान आहे,” याची प्रचिती या सोहळ्यातून सर्वांना आली.

