बकरी ईद अनुषंगाने दहिवडी शहरात पोलिसांचे भव्य संचलन सपोनि दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांना शांततेचे आवाहन
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी प्रतिनिधी :
आगामी बकरी ईद सण शांततामय, सुरक्षित आणि उत्साहात पार पडावा यासाठी दहिवडी पोलीस ठाण्याच्या वतीने दहिवडी शहरात पोलिसांचे भव्य संचलन आयोजित करण्यात आले. या संचलनाचे नेतृत्व दहिवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांनी केले.
या संचलनात पोलीस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसेच दंगा नियंत्रण पथकाचा सहभाग होता. दहिवडी पोलीस ठाण्यापासून संचलनास सुरुवात करण्यात आली. मुख्य बाजारपेठ, बसस्थानक परिसर, मशिदी परिसर, प्रमुख चौक व संवेदनशील भागातून संचलन काढण्यात आले. यावेळी नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून पोलिसांच्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
सणासुदीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असल्याचा संदेश या संचलनातून देण्यात आला. यावेळी सपोनि दत्तात्रय दराडे यांनी नागरिकांना शांतता, संयम आणि परस्पर सहकार्य राखण्याचे आवाहन केले.
“बकरी ईद हा शांतता आणि बंधुभावाचा सण आहे. सर्व नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिस प्रशासनास सहकार्य करावे. कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,” असे आवाहन सपोनि दत्तात्रय दराडे यांनी केले.
दहिवडी पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागांमध्ये विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला असून सीसीटीव्ही आणि गस्तीद्वारे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
या संचलनामुळे दहिवडी शहरात शांतता व सुरक्षिततेचा सकारात्मक संदेश गेला असून आगामी बकरी ईद सण उत्साहात आणि शांततेत पार पडेल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.

