मुसळधार पावसातही कर्तव्याची शर्थ! कराडच्या पोलीस हवालदाराचा व्हिडिओ व्हायरल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

कराड :प्रतिनिधी 

मुसळधार पावसात अनेकजण आसरा शोधत असताना, कराड शहरातील एक पोलीस हवालदार मात्र आपल्या कर्तव्यावर ठाम उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. पोलीस हवालदार जयवंत गोसावी यांचा पावसात वाहतूक सुरळीत ठेवतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून, नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

अचानक कोसळलेल्या पावसामुळे कराड शहरातील रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. अशा परिस्थितीत गोसावी यांनी पावसाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेचे दृश्य स्थानिक नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केले.

व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांकडून “खऱ्या अर्थाने जनतेची सेवा करणारे पोलीस” अशा भावना व्यक्त होत आहेत. कठीण परिस्थितीतही कर्तव्य पार पाडणाऱ्या अशा पोलिसांमुळे समाजात पोलीस दलाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे कराड पोलीस दलाची सकारात्मक प्रतिमा समोर आली असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *