पिंपरीजवळ भरधाव इको कारची दुचाकीला धडक; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, प्रतिनिधी :
माण तालुक्यातील पिंपरी गावाजवळ पंढरपूर–सातारा मार्गावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (१५ जुलै) दुपारी साडेतीनच्या सुमारास हॉटेल राजमाता समोरील पळशी फाटा येथे घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीरंग विठोबा राजगे (वय ६७, रा. पिंपरी, ता. माण) हे त्यांच्या हिरो स्प्लेंडर (एमएच-११-एयू-५३०९) दुचाकीवरून शेताकडे जात होते. त्यावेळी म्हसवडकडून साताऱ्याकडे जाणारी मारुती इको कार (एमएच-११-डीयू-२७४०) भरधाव व निष्काळजीपणे चालवत असलेल्या चालकाने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात राजगे गंभीर जखमी झाले. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथे नेण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
याप्रकरणी मृताचे पुत्र सागर श्रीरंग राजगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कारचालक कृष्णात राजाराम जाधव (रा. जांब बुद्रुक, ता. कोरेगाव, जि. सातारा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस सपोनि संदिप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आर. के. फडतरे करीत आहेत.

