पूर्ण होण्यापूर्वीच सातारा–पंढरपूर मार्गावरील पुलाला भेगा; सळई उघड्या, स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी

जनतेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर पूर्णत्वाच्या मार्गावर असलेल्या सातारा–पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील काही पुलांच्या गुणवत्तेबाबत आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुलाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच काँक्रीटला अनेक ठिकाणी भेगा पडल्याचे, तसेच एक्स्पान्शन जॉइंटजवळ लोखंडी सळई उघड्या दिसत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या पुलाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

यापूर्वी इंजि. सुनील पोरे यांनी सातारा–पंढरपूर मार्गावरील अपूर्ण पूल व मोऱ्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर रखडलेली कामे सुरू झाली होती. मात्र आता काम पूर्ण होण्यापूर्वीच पुलावर भेगा दिसून येत असल्याने या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, पुलाचे काम अद्याप पूर्ण झाले नसताना काँक्रीटला भेगा पडत असतील आणि काही ठिकाणी सळई उघड्या दिसत असतील, तर भविष्यात हा पूल जड वाहतुकीचा भार कितपत सुरक्षितपणे पेलणार, हा मोठा प्रश्न आहे. संबंधित यंत्रणेने या प्रकाराची तातडीने दखल घेऊन तज्ज्ञांकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी मागणी होत आहे.

तसेच कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि बांधकामाची तांत्रिक तपासणी करून दोषी आढळल्यास संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही नागरिकांनी केली आहे. सातारा–पंढरपूर मार्ग हा हजारो प्रवासी, शेतकरी आणि भाविकांसाठी महत्त्वाचा असल्याने या पुलांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *