बदलत्या राजकीय परिस्थितीचा फायदा घेतला तरच कोकणभूमीचे भवितव्य वाचेल : संजय कोकरे.** कोकणवासीयांनी संघटित होऊन हक्कांसाठी दबावगट निर्माण करण्याचे आवाहन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

गणेश तळेकर
कोकण : प्रतिनिधी

   देश आणि राज्यातील सतत बदलत असलेल्या राजकीय परिस्थितीचा योग्य वेळी आणि प्रभावीपणे फायदा घेतला तरच कोकणभूमीचे भवितव्य सुरक्षित राहील; अन्यथा विकासाच्या नावाखाली कोकणभूमी नरकभूमी होण्याचा धोका आहे, असा इशारा स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी दिला आहे.

      कोकणातील विकास, रोजगार, पायाभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन आणि स्थानिकांच्या हक्कांच्या प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत कोकरे यांनी कोकणवासीयांना संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी प्रभावी आवाज उठविण्याचे आवाहन केले.

     देश आणि राज्यातील राजकीय समीकरणे सातत्याने बदलत आहेत. या बदलत्या परिस्थितीत कोकणाच्या विकासासाठी स्वतंत्र धोरण आखणे, स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देणे तसेच मत्स्यव्यवसाय, शेती, पर्यटन, शिक्षण, आरोग्य आणि मूलभूत सुविधांसाठी ठोस निर्णय घेण्याची ही योग्य वेळ आहे. ही संधी गमावल्यास भविष्यात कोकणासमोरील समस्या अधिक गंभीर होऊ शकतात, असे कोकरे यांनी म्हटले आहे.

    कोकणातील नैसर्गिक संपत्ती, पर्यावरण आणि स्थानिक जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी प्रस्तावित अणुप्रकल्पांविरोधात व्यापक लोकचळवळ उभारण्याची आवश्यकता आहे. विकासाच्या नावाखाली स्थानिकांच्या हक्कांवर गदा येणार नाही, यासाठी जनतेने जागरूक आणि संघटित राहिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

      स्वतंत्र कोकणराज्य अभियानाच्या माध्यमातून कोकणातील विविध प्रश्न शासनापर्यंत पोहोचविणे, जनजागृती करणे आणि न्याय्य मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करणे यापुढेही सुरू राहणार आहे. कोकणाचा सर्वांगीण विकास, स्थानिकांना न्याय आणि भावी पिढ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सर्व कोकणवासीयांनी एकत्र येऊन प्रभावी दबावगट निर्माण करावा, असे आवाहन स्वतंत्र कोकणराज्य अभियानाचे संस्थापक अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *