विद्यार्थ्यांनी सोशल मीडियापेक्षा अभ्यासाला प्राधान्य द्यावे : डॉ. वैशाली कडूकर
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
शिष्यवृत्ती परीक्षेतील यश हे केवळ एका परीक्षेपुरते मर्यादित न राहता भविष्यातील मोठ्या ध्येयांची सुरुवात ठरली पाहिजे. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच अभ्यासाची शिस्त अंगीकारून गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानाचा पाया मजबूत करावा. पुढे यूपीएससी, एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे ध्येय निश्चित करावे, असे प्रतिपादन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी केले.
म्हसवड पोलीस ठाण्यात शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. कडूकर यांनी यशस्वी भविष्यासाठी अभ्यासातील सातत्य, योग्य मार्गदर्शन आणि आत्मविश्वासाचे महत्त्व अधोरेखित केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत मिळणारे यश विद्यार्थ्यांच्या मनात नवा आत्मविश्वास निर्माण करते. हाच आत्मविश्वास पुढील शैक्षणिक वाटचालीत आणि विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उपयोगी ठरतो. चांगले गुरू लाभणे ही विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील मोठी जमेची बाजू असून त्यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा योग्य उपयोग करून घेतल्यास भविष्यातील अनेक आव्हाने सहज पेलता येतात, असे डॉ. कडूकर यांनी सांगितले.
आजच्या काळात सोशल मीडियाचा वाढता वापर विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील एकाग्रतेवर परिणाम करत आहे. त्यामुळे अनावश्यक मोबाइल आणि सोशल मीडियावरील वेळ कमी करून तो अभ्यास, वाचन आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वापरण्याची गरज आहे. शालेय वयातच शिष्यवृत्ती आणि विविध स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केल्यास भविष्यात मोठ्या परीक्षांना सामोरे जाण्याची क्षमता निर्माण होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत, सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, क्रांतिवीर नायकवडी नागनाथअण्णा विद्यालयाच्या सचिव सुलोचना बाबर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षक अभिजीत सावंत यांनी केले. सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी उपस्थितांचे आभार मानले.

