गिनिज वर्ल्ड रेकॉर्डवीर वसिम शेखचा अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र, पुष्प व भेटवस्तू देऊन सन्मान
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड : प्रतिनिधी
कराटे क्रीडा प्रकारात असामान्य कामगिरी करत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद करणारा माण तालुक्याचा बाल कराटेपटू वसिम सादिक शेख याच्या उल्लेखनीय यशाची म्हसवड पोलीस ठाण्याने दखल घेत त्याचा विशेष गौरव केला. सातारा जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या हस्ते वसिमला प्रमाणपत्र, गुलाबपुष्प व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेच्या गोंदवले खुर्द येथील गोपालकृष्ण विद्यालयात इयत्ता सातवीत शिकणाऱ्या वसिम सादिक शेख याने अत्यंत कमी वयात कराटे क्रीडा प्रकारात कठोर मेहनत, सातत्य, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आपल्या कौशल्याच्या जोरावर त्याने थेट गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवून माण तालुक्यासह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
वसिमच्या या ऐतिहासिक कामगिरीची दखल घेत म्हसवड पोलीस ठाण्याच्या वतीने त्याला विशेष निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी वसिमच्या कामगिरीचे कौतुक करत त्याला प्रमाणपत्र, गुलाबपुष्प आणि खास भेटवस्तू देऊन सन्मानित केले. अल्पवयात मिळवलेल्या या यशाबद्दल त्यांनी वसिमचे अभिनंदन करून त्याच्या भावी क्रीडा वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या गौरवप्रसंगी वडूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनीही वसिमच्या कामगिरीचे भरभरून कौतुक करत त्याला पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण भागातील एका विद्यार्थ्याने कराटेसारख्या क्रीडा प्रकारात जागतिक स्तरावर झेप घेत गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव कोरणे ही माण तालुक्यासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. वसिमच्या यशामुळे ग्रामीण भागातील क्रीडापटूंना नवी प्रेरणा मिळाली असून, योग्य मार्गदर्शन, कठोर परिश्रम आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा याच्या बळावर जागतिक स्तरावर यश मिळवता येते, हे त्याने आपल्या कामगिरीतून सिद्ध केले आहे.
वसिमच्या या यशाबद्दल त्याचे कुटुंबीय, शिक्षक, प्रशिक्षक, मित्रपरिवार तसेच माण तालुक्यातील नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. म्हसवड पोलीस ठाण्यात झालेल्या या विशेष सन्मानामुळे वसिमच्या आनंदात आणखी भर पडली असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीकडे संपूर्ण माण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

