बोर्ड परीक्षेत घवघवीत यश; स्वरांजली व गायत्री ढोले यांचा अहिंसा पतसंस्थेत अकील भाई काझी यांच्या हस्ते सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड प्रतिनिधी :
       इयत्ता दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केल्याबद्दल कु. स्वरांजली ढोले व कु. गायत्री ढोले यांचा अहिंसा पतसंस्थेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात गौरव करण्यात आला. म्हसवड नगरपरिषदेचे नगरसेवक, गटनेते व बांधकाम सभापती अकील भाई काझी यांच्या हस्ते हा सत्कार पार पडला.

     कु. स्वरांजली गजकुमार ढोले हिने दहावी परीक्षेत ९४.४० टक्के गुण मिळवत केंद्रात प्रथम व विभागात द्वितीय क्रमांक पटकावला. तर धनंजय गाडगीळ कॉलेज, सातारा येथील कु. गायत्री शशिकांत ढोले हिने बारावी कॉमर्स शाखेत ९४.१७ टक्के गुण मिळवत सातारा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कौतुक व प्रोत्साहन म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

     यावेळी म्हसवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत यश संपादन करून गटनेते व बांधकाम सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अकील भाई काझी यांचाही अहिंसा परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला.

    कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब टाकणे म्हणाले, “सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येक मुलीने शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेले पाहिजे. स्वरांजली व गायत्री यांनी आपल्या यशातून समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. आज मुली सर्वच क्षेत्रात आघाडीवर असल्याचे हे उत्तम उदाहरण आहे.” तसेच अकील भाई काझी हे सर्वसामान्यांच्या कामासाठी सदैव तत्पर राहणारे लोकनेते असल्याचेही त्यांनी नमूद केले.

       अहिंसा पतसंस्थेचे कुटुंब प्रमुख व माजी नगराध्यक्ष नितीन भाई दोशी म्हणाले, “स्वरांजली व गायत्री यांनी मिळवलेले यश हे संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांनी ढोले कुटुंबाचे नाव उज्ज्वल केले आहे.” पुढे बोलताना त्यांनी अकील भाई काझी यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्यांची कामे करणारे अकील भाई हे लोकाभिमुख नेतृत्व आहे,” असे सांगितले.

       अध्यक्षीय भाषणात अकील भाई काझी म्हणाले, “अहिंसा पतसंस्था नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करते. अशा सत्कारांमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळते.” त्यांनी केलेल्या सत्काराबद्दल संस्थेचे आभार मानले.

  यावेळी यश ढोले, सुरज ढोले, स्वरांजली ढोले व गायत्री ढोले यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास गजकुमार ढोले, शशिकांत ढोले, चंद्रकांत कलढोणे, उमेश महामुनी, संस्थेचे संचालक बाळासाहेब सरतापे, धवल व्होरा तसेच संस्थेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन वाडेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत आहेरकर यांनी मानले.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *