सिद्धनाथ हायस्कूलमध्ये घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळा; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड | प्रतिनिधी

स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2026 अंतर्गत म्हसवड नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाच्या वतीने सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, म्हसवड येथे घनकचरा व्यवस्थापन जनजागृती कार्यशाळेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि कचरा व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यशाळेत घनकचरा व्यवस्थापन अधिनियम 2026, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, ओला व सुका कचरा विलगीकरण, प्लास्टिकमुक्त परिसर, पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छतेचे महत्त्व याविषयी पीपीटी सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी स्वच्छतेवरील प्रश्नमंजुषा, रंगसंगती (Colour Coding) खेळ आणि विविध सहभागात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत सक्रिय सहभाग नोंदविला.

यावेळी नगराध्यक्षा श्रीमती पूजा सचिन विरकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “स्वच्छतेची सुरुवात घर आणि शाळेपासूनच झाली पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्याने कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करून स्वच्छतेचा संदेश आपल्या कुटुंबात आणि समाजात पोहोचवावा. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे,” असे आवाहन केले.

सभापती विजय रामचंद्र बनगर यांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता अभियानाची माहिती देत, “स्वच्छ, सुंदर आणि हरित म्हसवड घडविण्यासाठी प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा. घराघरातून कचऱ्याचे योग्य वर्गीकरण सुरू झाले तर स्वच्छतेचे उद्दिष्ट सहज साध्य होईल,” असे सांगितले.

कार्यशाळेअखेर विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेत “स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे – स्वच्छ म्हसवड, सुंदर म्हसवड, हरित म्हसवड” हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा संकल्प केला.

या कार्यक्रमास नगराध्यक्षा श्रीमती पूजा सचिन विरकर, उपनगराध्यक्षा श्रीमती श्रीदेवी निशांत पिसे, सभापती विजय रामचंद्र बनगर, नगरसेवक अभिषेक विरकर, नगरसेवक महावीर विरकर, मुख्याधिकारी डॉ. सचिन माने, स्वच्छता निरीक्षक सागर सरतापे, सिटी को-ऑर्डिनेटर आकाश पिसे, सिद्धनाथ हायस्कूलचे प्राचार्य दासरे सर, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नगरपरिषदेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाने भविष्यातही शहरातील शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांसाठी अशाच जनजागृतीपर कार्यशाळा, प्रबोधन अभियान आणि संवाद कार्यक्रम राबवून स्वच्छ भारत मिशन (नागरी) 2.0 आणि स्वच्छ सर्वेक्षण 2026 यशस्वी करण्याचा निर्धार व्यक्त केला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *