आंधळीतील सौर प्रकल्पातील अॅल्युमिनियम तारा चोरीचा उलगडा; गोंदिया जिल्ह्यातील चौघे जेरबंद, ₹८२,५०० चा मुद्देमाल हस्तगत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी, प्रतिनिधी :

दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंधळी येथील सौर ऊर्जा प्रकल्पातून अॅल्युमिनियम तारा व लोखंडी पोल चोरी करणाऱ्या गोंदिया जिल्ह्यातील चौघांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात दहिवडी पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून चोरीस गेलेला ₹८२,५०० किमतीचा १,२०० मीटर अॅल्युमिनियम तारा आणि दोन लोखंडी पोल हस्तगत करण्यात आले आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंधळी (ता. माण) येथील शुभम चिंचकर यांच्या शेतातील एस.एस. इलेक्ट्रिकल कंपनीच्या सूर्यघर प्रकल्पातून २४ एप्रिल ते ९ जून २०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी १,२०० मीटर अॅल्युमिनियम तारा व दोन लोखंडी पोल असा एकूण ₹८२,५०० किमतीचा माल चोरून नेला होता. याप्रकरणी इलेक्ट्रिशियन सुपरवायझर विश्वास नामदेव पांढरे यांच्या फिर्यादीवरून दहिवडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचा तपास सुरू असताना प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे कंपनीत काम करणाऱ्या काही कामगारांवर संशय घेतला. सखोल चौकशीत दीपक गोविंद मेश्राम, राहुल चरण अलगदेवे, दुर्गेश राधेलाल मौजे आणि संदीप बकाराम तुमसरे (सर्व रा. गोंदिया जिल्हा) यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले.

पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन अटक केली असून, त्यांच्या कबुलीजबाबानंतर चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे सौर प्रकल्पातील चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी उलगडा झाला आहे.

ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे, महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे, पोलीस उपनिरीक्षक गुलाबराव दोलताडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश हांगे तसेच दहिवडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पथकाने पार पाडली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *