संत नामदेव महाराज स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार; सातारा शिंपी समाजाच्या त्रैमासिक सभेत महत्त्वपूर्ण निर्णय
व्हिजन २४ तास न्यूज
कोरेगाव, :प्रतिनिधी
सातारा जिल्हा शिंपी समाजाची त्रैमासिक सभा कोरेगाव येथे जिल्हाध्यक्ष इंजि. सुनील पोरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. सभेत समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करताना पंढरपूर येथील संत नामदेव महाराज स्मारकासंदर्भात मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांची भेट घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
शिंपी समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी महामंडळ स्थापनेत सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे योगदान लक्षात घेऊन महामंडळावर इंजि. सुनील पोरे यांची नियुक्ती करावी, अशी एकमुखी मागणीही सभेत करण्यात आली. तसेच येत्या १० ऑगस्ट रोजी होणारा संत नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा भव्य स्वरूपात साजरा करण्याबाबत नियोजन करण्यात आले.
सभेला पुणे येथील नासपचे सहसचिव दिगंबर क्षीरसागर हे विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी समाजबांधवांच्या भावना व मागण्या राज्याध्यक्षांपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन दिले.
कोरेगाव तालुका अध्यक्ष तथा जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदीप धोंगडे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. जिल्हा सचिव श्रीकांत फुटाणे यांनी प्रस्तावना मांडली. चर्चेत अतुल बारटक्के, प्रमोद बेंद्रे, डॉ. मकरंद पोरे, प्रदीप पोरे, किशोर हिरवे, गजानन लंगडे, मनोज महाडीक आदींनी सहभाग घेतला.
यावेळी सातारा येथे लवकरच दोन दिवसीय राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्याचा मानसही व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोरेगाव येथील समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले असून आभार प्रदर्शन संदीप धोंगडे यांनी केले.

