म्हसवडमध्ये धाडसी युवक इरफान मुजावर यांचा मुस्लिम समाजातर्फे जाहीर सत्कार

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड, प्रतिनिधी :

सातारा-सोलापूर मार्गावरील तांदूळवाडी येथे झालेल्या दुर्दैवी अपघातात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विहिरीत उडी घेऊन पाच जणांचे प्राण वाचवणाऱ्या धाडसी युवक इरफान मुजावर यांचा म्हसवड येथील मुस्लिम समाजातर्फे सत्कार करण्यात आला.

सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा पिकअप टेम्पो अपघातग्रस्त होऊन विहिरीत कोसळल्यानंतर इरफान मुजावर यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी गावकऱ्यांना संपर्क केला. त्यानंतर कोणताही विचार न करता विहिरीत उडी घेत त्यांनी एका चिमुकल्यासह दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांना ग्रामस्थांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे अनेकांचे प्राण वाचले.

या अद्वितीय मानवतावादी कार्याची दखल घेत म्हसवडमधील मुस्लिम समाजाने आयोजित कार्यक्रमात इरफान मुजावर यांना शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी बोलताना शहर काझी इर्षाद काझी यांनी इरफान त्यांच्या साहसाचे कौतुक करत, “धर्म, जात किंवा पंथ यापेक्षा माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे, याचे जिवंत उदाहरण म्हणजे इरफान मुजावर,” असे गौरवोद्गार काढले.

यावेळी इर्षाद काझी पुढे म्हणाले की, संकटकाळात दुसऱ्याच्या मदतीला धावून जाणारी माणसेच समाजाचे खरे वैभव असतात. इरफान यांनी दाखवलेले धैर्य आणि निःस्वार्थी सेवा ही युवकांसाठी प्रेरणादायी असून समाजात बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी आहे.

सत्कार प्रसंगी इर्षाद काझी ,इंजि. सद्दाम पटेल, सलीम मुल्ला , दाऊद मुल्ला, इमरान(बाबू )मुल्ला, आसिफ मुजावर, दिलावर जमादार, शब्बीर तांबोळी, मोहसिन काझी , गुलमहम्मद तांबोळी, मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी इरफान मुजावर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

“माणुसकी हाच सर्वात मोठा धर्म” हा संदेश आपल्या कृतीतून देणाऱ्या इरफान मुजावर यांच्या धाडसाचा आणि सेवाभावाचा हा सत्कार उपस्थितांसाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा क्षण ठरला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *