कराड तालुक्यातील गॅस एजन्सींच्या गलथान कारभाराविरोधात संताप; चौकशीची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
कुलदीप मोहिते
कराड (प्रतिनिधी) :
कराड तालुक्यातील उंब्रज, शिरगाव, वराडे, मसूर, कराड आदी ठिकाणच्या गॅस एजन्सींच्या मनमानी व गलथान कारभारामुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, संबंधित एजन्सींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.
पुरवठा अधिकारी सौ. नायकवडी यांनी स्वतः उंब्रज येथे येऊन सर्व गॅस एजन्सींना घरपोच गॅस सिलेंडर पुरवठा करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या. मात्र, त्या सूचनांकडे दुर्लक्ष करून अद्याप एकाही एजन्सीकडून ग्राहकांना घरपोच सेवा दिली जात नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
तसेच, गॅस बुकिंगनंतर ओटीपी प्राप्त झाल्यानंतरही ग्राहकांना तात्काळ गॅस मिळत नाही. उलट १५ ते २० दिवसांनी गॅस मिळेल असे सांगितले जात असल्याने ग्राहक व एजन्सी चालक यांच्यात वारंवार वाद होत आहेत. अनेक वेळा ग्राहकांना स्वतः एजन्सीकडे जाऊन गॅस आणावा लागत असून, यामध्ये महिला व वृद्ध नागरिकांची संख्या अधिक असल्याने त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित गॅस एजन्सींची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कराड तालुकाप्रमुख संजय भोसले व शिवसैनिकांनी केली आहे. तसेच, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी विक्रम पिसाळ, उमेश अतकरी, सतीश पाटील, योगेश गुजले, संदीप थोरात, पांडुरंग सावंत, जीवन गायकवाड, सुहास देशमाने, अमजद मुसांडे, प्रभाकर कमाने, गणेश जांभळे, अतुल वैद्य, शंकर शिंदे, सुनील हजारे, प्रदीप पोळ, विनोद मोरे, सागर कमाने आदी शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते.

