म्हसवडमध्ये घंटागाडीचा ‘गुपचूप’ खेळ; शिक्षक कॉलनीतील नागरिक संतप्त — ठोस कारवाईची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड (प्रतिनिधी) :
शहर स्वच्छतेच्या नावाखाली मोठमोठे दावे करणाऱ्या म्हसवड नगरपालिकेच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शिक्षक कॉलनी परिसरात कचरा गोळा करण्यासाठी येणारी घंटागाडी नियमित येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले असून, संबंधित यंत्रणेच्या ढिसाळ कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शहरातील इतर भागांतून येताना घंटागाडी मोठ्याने गाणे लावत येते, त्यामुळे नागरिकांना कचरा देण्यासाठी सूचना मिळते. मात्र, शिक्षक कॉलनीत प्रवेश करताच चालक गाणे बंद करून गाडी थेट पुढे घेऊन जातो. त्यामुळे अनेक वेळा नागरिकांना गाडी आल्याचे कळतच नाही आणि कचरा साचून राहतो. ही बाब केवळ निष्काळजीपणाची नसून जाणीवपूर्वक टाळाटाळ केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
याबाबत विचारणा केल्यास “गाडी आधीच कचऱ्याने भरलेली आहे” असे कारण पुढे केले जाते. मात्र, हा प्रकार वारंवार घडत असल्याने नागरिकांनी या स्पष्टीकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “जर गाडी भरलेली असेल, तर नियोजन का नाही? आणि मग कॉलनी वगळून जाण्याचा अधिकार कोण दिला?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत कोणताही ठोस बदल झालेला नाही. प्रत्येक वेळी संबंधित ठेकेदाराला बोलावून तोंडी सूचना दिल्या जातात; मात्र काही दिवसांनी पुन्हा तेच प्रकार सुरू होतात. आठवडाभर परिस्थिती सुधारते आणि नंतर पुन्हा जुनाच ‘ढिसाळपणा’ सुरू होतो, अशी वस्तुस्थिती आहे.
विशेष म्हणजे, अनेक वेळा नागरिकांना स्वतः ठेकेदाराशी संपर्क साधून गाडी परत कॉलनीत बोलवावी लागते. म्हणजेच, ज्या सेवेसाठी नागरिक कर भरतात, ती सेवा मिळवण्यासाठीच पुन्हा नागरिकांनाच धावपळ करावी लागते, ही अत्यंत गंभीर बाब आहे.
या पार्श्वभूमीवर शिक्षक कॉलनीतील नागरिकांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांनी केवळ तोंडी सूचना न देता संबंधित ठेकेदार व वाहन चालकावर कडक व ठोस कारवाई करावी, अशी ठाम मागणी केली आहे. “नियमित व पारदर्शक कचरा संकलन ही आमची मूलभूत अपेक्षा आहे, ती पूर्ण होत नसेल तर जबाबदारांवर कारवाई झालीच पाहिजे,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
शहर स्वच्छतेचा गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाने आता कागदोपत्री आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष कृती दाखवण्याची वेळ आली आहे. अन्यथा नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

