माण तालुक्यात दोन ठिकाणी मटका अड्ड्यांवर कारवाई; दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी / प्रतिनिधी
दहिवडी पोलिसांनी माण तालुक्यातील दहिवडी व शिंगणापूर येथे बेकायदा ‘कल्याण’ मटका जुगारावर दोन स्वतंत्र कारवाया करत दोघांविरुद्ध महाराष्ट्र जुगार अधिनियमाच्या कलम 12(अ) अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पहिली कारवाई 31 जुलै रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास दहिवडी येथील दुर्गामाता मंदिराच्या भिंतीलगत करण्यात आली. यावेळी विजय प्रकाश अवघडे (वय 31, रा. गांधीनगर, दहिवडी) हा बेकायदा मटका जुगारासाठी लोकांकडून पैशांची पैज स्वीकारताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडून रोख 1,170 रुपये, स्लिप बुक व बॉलपेन असा जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 230/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीस कलम 35(3) अन्वये नोटीस देण्यात आली आहे.
दुसरी कारवाई त्याच दिवशी दुपारी साडेतीनच्या सुमारास शिंगणापूर येथील एसटी स्टँडसमोरील पानटपरीच्या आडोशाला करण्यात आली. येथे रघुनाथ अण्णा चव्हाण (वय 62, रा. शिंगणापूर, ता. माण) हा बेकायदा मटका जुगार चालवत असल्याचे निदर्शनास आले. त्याच्याकडून 750 रुपये रोख रक्कम, स्लिप बुक व बॉलपेन जप्त करण्यात आले. याप्रकरणी गुन्हा क्रमांक 229/2026 दाखल करण्यात आला असून आरोपीस नोटीस बजावण्यात आली आहे.
दोन्ही कारवाया सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. पहिल्या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार बी. एस. खांडेकर तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार एन. एस. खाडे करीत आहेत.

