कुरणेवाडी दरोडा प्रकरणाचा ४८ तासांत छडा; ७ आरोपी गजाआड म्हसवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त धडाकेबाज कारवाई
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
येथील मिसाळ वस्तीवरील वृद्ध दांपत्याच्या घरावर झालेल्या दरोडा प्रकरणाचा अवघ्या ४८ तासांत छडा लावत म्हसवड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत सुमारे ६५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दि. ४ मे रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास प्रल्हाद मिसाळ (वय ६५) व त्यांची पत्नी सुलाबाई मिसाळ (वय ६२) हे शेतातील घराच्या सोप्यात झोपलेले असताना अनोळखी आरोपींनी घराच्या ग्रिलची कडी काढून आत प्रवेश केला. आरोपींनी वृद्ध दांपत्याला दाबून धरत मारहाण केली व चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण ७२ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने लुटून नेला.
घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फिर्यादी प्रल्हाद ज्ञानू मिसाळ यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. या गंभीर घटनेची दखल घेत पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक , उपविभागीय पोलीस अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांनी घटनास्थळी भेट देत तपासाला गती दिली.
म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली दोन विशेष पथके तयार करण्यात आली. आरोपींनी घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा न सोडल्याने तपासास मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र गोपनीय माहिती, तांत्रिक विश्लेषण व कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींपर्यंत मजल मारली.
या प्रकरणात दादा आण्णा बुधावले, संजय आण्णा बुधावले (वय २३), महादेव आण्णा बुधावले (वय २२), हर्षद युवराज बुधावले (वय १९), ऋतिक भारत बनसोडे (वय २०) तसेच दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेण्यात आले. सर्व आरोपी हे येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सखोल चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडून चोरीस गेलेले दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आरोपींना ९ मे २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक करीत आहेत.
या कारवाईत म्हसवड पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून त्यांच्या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

