मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी धडक; लेखी आश्वासनानंतर सोहम शिर्के यांचे उपोषण स्थगित

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी 

माण -खटाव तालुक्यातील २६ मूलभूत प्रश्नांसाठी तसेच मराठा आरक्षणाच्या विविध मागण्यांसाठी म्हसवड नगरपालिकेसमोर सुरू असलेले आमरण उपोषण अखेर प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. त्यांच्या उपस्थितीमुळे आंदोलनाला मोठे बळ मिळाले.

         गेल्या चार दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते व आंदोलक नेते सोहम शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण सुरू होते. आंदोलनाला मान-खटाव तालुक्यातील विविध गावांमधून मोठा प्रतिसाद मिळाला होता. शेतकरी, युवक, महिला तसेच विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.

           यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका करत, “मी शांत आहे म्हणजे माघार घेतली असे समजू नका. सरकारने सातारा गॅझेट तात्काळ लागू केले पाहिजे. गरज पडल्यास सरकारच्या छाताडावर बसूनही निर्णय करून घेऊ,” असा इशारा दिला.

    दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी सोहम शिर्के यांची प्रकृती खालावली होती. रक्तदाब व साखरेचे प्रमाण कमी झाल्याने वैद्यकीय पथकाकडून त्यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी जरांगे पाटील यांनी स्वतः शिर्के यांची विचारपूस करून आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

       तहसीलदारांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. २६ मागण्यांपैकी बहुतांश मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.

          या आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये सातारा गॅझेटियर लागू करणे, कुणबी प्रमाणपत्रासाठी कार्यवाही, अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजना सुरू करणे, दुष्काळी भागात पाणीपुरवठा, वीज समस्यांचे निराकरण, तसेच म्हसवड परिसरातील आरोग्य व शिक्षण सुविधा सुधारण्याच्या मागण्यांचा समावेश होता.

     प्रशासनाने येत्या आठ दिवसांत प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेऊन सर्व मागण्यांवर टप्प्याटप्प्याने निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

     यावेळी बाळासो हास्पे, नितीन शिंदे, तानाजी पवार, अरविंद जगदाळे, विकास देवकर, डॉ. सौरभ सावंत, गंगाराम शिंदे, मनोज जगदाळे, सचिन जगताप, आकाश माने, गणेश काटकर, अमोल पोळ, बाळासाहेब फडतरे, संदीप फडतरे, रणजीत कदम, अजित शिर्के, हर्षवर्धन कदम, सुधीर माने, रवी गायकवाड, आकाश दडस आणि सचिन शिंगाडे आदी कार्यकर्त्यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

         याबाबत प्रतिक्रिया देताना सोहम शिर्के म्हणाले, “हा लढा संपलेला नाही, तर केवळ स्थगित केला आहे. प्रशासनाने आश्वासनांची पूर्तता केली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.”


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *