स्मार्ट मीटरला कराड शिवसेनेचा विरोध; महावितरणला निवेदन

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड, :प्रतिनिधी
महावितरण कंपनीकडून राज्यभरात स्मार्ट/प्रिपेड वीज मीटर बसविण्याच्या मोहिमेला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने तीव्र विरोध दर्शविला आहे. या संदर्भात कराड उत्तर तालुकाप्रमुख संजय गुलाबराव भोसले यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या ओगलेवाडी कार्यालयातील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात स्मार्ट मीटर मोफत बसविण्याच्या दाव्यावर आक्षेप घेत, या मीटरचा खर्च भविष्यात वीजदरवाढीच्या माध्यमातून ग्राहकांकडून वसूल केला जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी ग्रामसभेचे ठराव असतानाही ग्राहकांना पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

स्मार्ट मीटर बसवल्यानंतर काही ग्राहकांच्या वीजबिलात मोठी वाढ झाल्याची तक्रारही निवेदनात करण्यात आली असून, ग्राहकांची परवानगी न घेता बसविण्यात आलेले मीटर तातडीने काढून टाकावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

यासोबतच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून राज्यातील इतर कार्यालयांनाही योग्य सूचना देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा सर्व घटकांना सोबत घेऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

या निवेदनावर संजय भोसले(शिवसेना तालुका प्रमुख उत्तर कराड )यांच्यासह प्रशांत आत्माराम यादव(राष्ट्रवादी कॉ.कराड तालुका अध्यक्ष )जीवन गायकवाड (उपतालुका प्रमुख कराड उत्तर )बाजीराव सवळेकर, सागर सुभाष पिसाळ आणि अमजद बाबालाल मुसांडे, कृष्णात पवार, हेमंत माने, सुभाष पिसाळ संजय कदम, सुभाष शीलवंत, बापूराव कदम, उत्तम चव्हाण, दीपक काशीद, दिलावर संदे इ. कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *