पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षांच्या सतर्कतेमुळे जखमी कोल्ह्याला जीवदान

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड (प्रतिनिधी) :
माण तालुक्यातील भाटकी येथे जखमी अवस्थेत आढळलेल्या एका कोल्ह्याला सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेच्या जिल्हाध्यक्षा सौ. हर्षदा शिर्के यांच्या सतर्कतेमुळे वेळेत मदत मिळाली असून, त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले आहे. त्यांच्या तत्परतेमुळे एका मुक्या वन्यजीवाला नवजीवन मिळाल्याची भावना परिसरातून व्यक्त होत आहे.

भाटकी परिसरात एक कोल्हा गंभीर जखमी अवस्थेत असल्याची माहिती प्राणी मित्र सुशांत कोडलकर यांनी सौ. हर्षदा शिर्के यांना दिली. ही माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली.

शिर्के यांच्या सतर्कतेमुळे वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मोठ्या शिताफीने जखमी कोल्ह्याला पकडून सुरक्षित स्थळी हलवले. प्राथमिक उपचारानंतर त्याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात पाठवण्यात आले.

सध्या वन्यजीव मानवी वस्तीत आल्यास भीतीपोटी त्यांना इजा पोहोचवण्याच्या घटना घडत असताना, सौ. हर्षदा शिर्के यांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि मानवतावादी भूमिका सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे. त्यांच्या या कार्यामुळे एका मुक्या प्राण्याचे प्राण वाचले असून, परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील संघटनेकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *