पुणे बालेवाडी येथे झालेल्या “इंडियन ओपन पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025” मध्ये सातारा जिल्ह्याची दमदार झळाळी
व्हिजन २४ तास न्यूज संपादक अहमद मुल्ला
म्हसवड : प्रतिनिधी
भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या मार्गदर्शनाखाली पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन व AGC स्पोर्ट्स यांच्या वतीने आयोजित “इंडियन ओपन पॅरा अथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025” ही भव्य राष्ट्रीय स्पर्धा पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे १६ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत सातारा जिल्ह्याने क्रीडा क्षेत्रात आपले वर्चस्व सिद्ध करत तब्बल २३ पदके पटकावली. यामध्ये १७ सुवर्ण, ३ रौप्य व ३ कांस्य पदकांचा समावेश असून ही जिल्ह्यासाठी ऐतिहासिक कामगिरी ठरली आहे.

जिल्ह्यातील १५ पॅरा खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात चमक दाखवत विजय संपादन केला.
ज्युनियर गटात – वेदांत साळुंखे, प्रणव पवार, आप्पा शेंडगे व प्राजक्ता काळे यांनी सुवर्ण कामगिरी करत जिल्ह्याचा झेंडा उंचावला.
सिनियर गटात – विक्रम शेंडगे, नवनाथ बिडगर व सुमित कांबळे यांनी दमदार खेळी सादर करत सुवर्णासह अन्य पदकांची कमाई केली.
या यशामध्ये सातारा पॅरा स्पोर्ट्स मार्गदर्शक प्रा. राजेंद्र पवार सर व शिर्के सर यांचे मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभल्याने खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवता आली.
सातारा जिल्ह्यातील या ऐतिहासिक यशामुळे पॅरा क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण असून, सातारा जिल्हा हा पॅरा स्पोर्ट्ससाठी उदयोन्मुख केंद्र म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

