म्हसवड प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी घेतला लाभ
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड, दि. १३ (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र शासनाच्या ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाला म्हसवड शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्राथमिक आरोग्य केंद्र, म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेल्या सर्वसमावेशक आरोग्य शिबिरात शेकडो नागरिकांनी विविध वैद्यकीय तपासण्या करून घेत आरोग्याबाबत जागरूकतेचा संदेश दिला.

शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्या सौ. सोनाली पोळ, पंचायत समिती सदस्या सौ. कल्पना वीरकर, म्हसवडच्या नगराध्यक्ष सौ. पूजा वीरकर, आरोग्य समितीचे सभापती विजय बनगर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. उपस्थित मान्यवरांनी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी अशा उपक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
या शिबिरात १५० नागरिकांची मधुमेह व रक्तदाब तपासणी करण्यात आली, तर १५० जणांची तोंडाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली. आयुष्मान भारत व आभा कार्डसाठी ५७ नागरिकांची नोंदणी झाली. तसेच १४ नागरिकांचे क्षयरोग (टीबी) स्क्रीनिंग, ८१ नागरिकांची नेत्र तपासणी, ५० नागरिकांची ईसीजी तपासणी, ३३ नागरिकांच्या हिमोग्लोबिन (एचबी) तपासण्या, ३३ नागरिकांच्या एचआयव्ही तपासण्या आणि ३३ नागरिकांच्या एचबीएसएजी तपासण्या करण्यात आल्या.
शिबिराला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, डॉ. सुनील चव्हाण, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर तसेच प्रभारी अधिकारी डॉ. डोंबे यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली व आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले.
या यशस्वी उपक्रमासाठी डॉ. योगेश कुलकर्णी, डॉ. श्रीमती वीरकर, डॉ. श्रीमती पालवे, डॉ. श्रीमती क्षीरसागर यांच्यासह नलिनी गोंजारी, पुष्पा खुसपे, सुधीर पंडित, अजित लीटे, युवराज सानप, रामचंद्र खांडेकर, गणेश सावंत, दीपक पवार, विशाल देशमुख, अभिषेक भोसले, श्रवण गंगेकर, अनिता देशमुख, सोनाली भोसले, सारिका पिसे, कोमल कोळेकर, शिल्पा तोलणुरे, शुभांगी पिसाळ, सुप्रिया सुतार, सुजाता उगलमोगले, विश्वास शिंदे, नाना वीरकर, दत्तात्रय भोंगले, शहाजी गायकवाड, आक्काताई कोळेकर, शोएब मुल्ला, जंगम शिरतोडे आणि शुभम नाडेकर यांनी मोलाचे योगदान दिले.
आरोग्य सेवा नागरिकांच्या दारी पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी, वेळेत निदान आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचली. त्यामुळे ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या अभियानाच्या उद्दिष्टांना निश्चितच बळ मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

