उन्हाच्या काहिलीत थंड पेयांना मागणी वाढली; उत्पादन घटल्याने बाजारात महागाई

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कराड | प्रतिनिधी – कुलदीप मोहिते

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असताना शरीराला थंडावा देणाऱ्या कलिंगड, लिंबू, काकडी, उसाचा रस आणि कोकम यांची मागणी वाढली आहे. मात्र, यंदाच्या अवकाळी पावसाचा आणि हवामान बदलाचा मोठा फटका या पिकांना बसल्याने उत्पादन घटले असून दर्जाही खालावला आहे. परिणामी या सर्व फळभाज्यांचे दर वाढले असून ग्राहकांनाही याचा आर्थिक फटका बसत आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे विशेषतः स्थानिक कलिंगडाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला आहे. कलिंगडाचा गोडवा कमी झाल्याने बाजारात इतर भागांतील कलिंगडाची आवक वाढली आहे. लिंबू व काकडीच्या उत्पादनातही घट झाल्याने त्यांचे दर वाढले आहेत. लिंबाला तर संत्री व मोसंबीच्या तोडीचा दर मिळत असल्याने लिंबू सरबतही महाग झाले आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा कलिंगडाच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली असून मोठ्या काकडीमागे ५ ते १० रुपयांनी वाढ झाली आहे. उसाचे दरही शेकड्यामागे सुमारे १०० रुपयांनी वाढले आहेत. कोकमची उपलब्धता अनेक ठिकाणी कमी झाली असून काही बाजारात तर त्याचा तुटवडा जाणवत आहे.

दरम्यान, उत्पादन घटल्याने बाजारात मालाची आवक कमी झाली आहे. वाढत्या उन्हामुळे मागणी वाढली असली तरी शेतकऱ्यांना दर्जाहीन उत्पादनामुळे अपेक्षित दर मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही अडचणीत सापडले आहेत.

नैसर्गिक थंड पेयांचे दर वाढल्याने ग्राहक आता पर्याय म्हणून बंद बाटल्यांतील सरबत व पॅकेज्ड पेयांकडे वळत आहेत. त्यामुळे स्थानिक फळांवरील मागणी काही प्रमाणात कमी होत असल्याचेही चित्र आहे.

चौकट :

अवकाळी पावसामुळे कलिंगडाला तडे जात आहेत. त्यामुळे उत्पादनाचे नुकसान होऊन आवक घटली आहे. घाऊक बाजारात दर वाढले असले तरी ग्राहक कमी किमतीची अपेक्षा करतात, त्यामुळे विक्रेत्यांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

— मंगेश हजारे, भाजी विक्रेते


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *