बहिणीच्या प्रेमविवाहाचा राग; तरुणावर चाकू हल्ला, खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी (ता. माण,) :
बहिणीने प्रेमविवाह केल्याच्या रागातून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोंदवले बुद्रुक येथे घडली आहे. या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हणमंत लक्ष्मण दौंड (वय 32, रा. पळशी, ता. माण) हे 24 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 12.45 वाजण्याच्या सुमारास गोंदवले ते म्हसवड मार्गावरून जात असताना ही घटना घडली. गोंदवले बुद्रुक येथील गरीब नवाज मटन व चिकन शॉप समोरील बंद टपरीजवळ आरोपी गणेश तात्याबा ढोले (रा. पळशी) याने त्यांना अडवले.
यावेळी “माझ्या बहिणीला पळवून नेऊन लग्न का केले?” असा जाब विचारत आरोपीने अचानक चाकूने हल्ला केला. त्यानंतर घटनास्थळी आलेल्या चार ते पाच अनोळखी व्यक्तींनीही फिर्यादीला धरून त्याच्यावर चाकूने वार करत गंभीर जखमी केले. तसेच सोबत असलेल्या दाजी काळे व विनायक ढोले यांनाही मारहाण करण्यात आली.
हल्ल्यात जखमी झालेल्या हणमंत दौंड यांच्या बरगडी, खांदा आणि डोळ्याखाली जखमा झाल्या असून ते गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, गोंधळात फिर्यादीच्या खिशातील सुमारे एक लाख रुपये चोरीला गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 114/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 119(2),8,i८p9 189(2), 189(4) अंतर्गत खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. प्रभारी अधिकारी सपोनि दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून, म.पो.उ.नि. एस. ए. धोंगडे हे पुढील तपास करत आहेत. आरोपी गणेश ढोले फरार असून, इतर अनोळखी संशयितांचा शोध सुरू आहे.

