नरवणे येथे अवैध विदेशी दारू साठ्यावर दहिवडी पोलिसांचा छापा; 10,825 रुपयांचा मुद्देमाल जप्त
व्हिजन २४ तास न्यूज
दहिवडी, प्रतिनिधी :
माण तालुक्यातील नरवणे गावात अवैध विदेशी दारू विक्रीविरोधात दहिवडी पोलिसांनी धडक कारवाई करत 10 हजार 825 रुपयांचा विदेशी दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 29 मे रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नरवणे गावातील मातोश्री पान शॉपच्या आडोशाला उघड्यावर एक व्यक्ती बेकायदेशीररित्या विदेशी दारू विक्रीसाठी साठा करून ठेवत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकला.
या कारवाईत आरोपी विलास संजय धोत्रे (वय 31, रा. नरवणे, ता. माण, जि. सातारा) याच्या ताब्यातून विविध ब्रँडच्या विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. यामध्ये मॅकडॉवेल नंबर वन, मास्टर डिलाईट प्रीमियम व्हिस्की, इम्पेरियल ब्ल्यू, ओल्ड मंक आणि डीएसपी ब्लॅक या ब्रँडच्या एकूण 57 सीलबंद बाटल्यांचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत 10 हजार 825 रुपये इतकी आहे. तपासासाठी प्रत्येक प्रकारातील एक बाटली नमुना म्हणून जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी पोलीस शिपाई गणेश भगवान खाडे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 163/2026 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) अन्वये नोंद करण्यात आला आहे. आरोपीस BNSS कलम 35(3) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस हवालदार व्ही. डी. विरकर यांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस हवालदार खाडे करीत आहेत.
माण तालुक्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात दहिवडी पोलिसांनी सुरू केलेल्या मोहिमेमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.

