पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
व्हिजन २४ तास न्यूज
फलटण, प्रतिनिधी :
रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने दिनांक 31 मे 2026 रोजी पुण्यश्लोक महाराणी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त विविध शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत तृतीय क्रमांक प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

फलटण एज्युकेशन सोसायटी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, श्रीराम एज्युकेशन सोसायटी यशवंतराव चव्हाण हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सौ. वेणुताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, जय भवानी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तिरकवाडी तसेच कुरेशी मोहल्ला येथील उर्दू स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थिती लाभलेले श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या यशाचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांनी भविष्यातही जिद्द, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर उच्च शिखरे गाठावीत, असा प्रेरणादायी संदेश दिला.
इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये कु. सानिका रमेश सोनवलकर, कु. वैष्णवी राहुल शिंदे, चि. साहिल नंदकुमार जाधव, कु. श्रेया नितीन कदम आणि चि. गौरव सुनील धालवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच इयत्ता बारावीतील कु. सृष्टी चंद्रकांत लोणकर, कु. सुप्रिया संतोष आंधळे, कु. अंकिता सुरेश मसुगडे, कु. श्रेया हिम्मत फरांदे आणि कु. संस्कृती विजय फरांदे या गुणवंत विद्यार्थिनींचाही गौरव करण्यात आला.
उर्दू शाळेतील इयत्ता दहावीची विद्यार्थिनी कु. इरम अक्रम बेपारी आणि इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कु. जोया मोसिन कुरेशी यांचा विशेष सत्कार त्यांच्या शाळेत जाऊन करण्यात आला. या प्रसंगी रणरागिणी संस्थेच्या संचालिका सौ. रझिया शेख, संस्थेचे सचिव श्री. मारुती टकले तसेच माजी प्राचार्या सौ. शाहीन शेख उपस्थित होत्या.

कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करताना त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
“विद्यार्थ्यांचा सन्मान म्हणजे त्यांच्या कर्तृत्वाला दिलेली प्रेरणेची सलामी असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागतो,” असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांनी केले असून उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

