ECHS कराडच्या प्रलंबित समस्यांबाबत कमांडंटची भेट सैनिक फेडरेशनचे प्रशांत कदम यांनी मांडल्या विविध मागण्या; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
व्हिजन २४ तास न्यूज
कराड : प्रतिनिधी
येथील ECHS पोलिक्लिनिकमधील माजी सैनिक, त्यांच्या कुटुंबीय तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सैनिक फेडरेशनचे सदस्य तथा जिल्हा संरक्षण समितीचे सदस्य प्रशांत कदम यांनी मिलिटरी हॉस्पिटल खडकी, पुणे येथील कमांडंट ब्रिगेडियर एम. एच. खडकी यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे सैनिक फेडरेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.
या भेटीत ECHS कराड पोलिक्लिनिकमधील प्रलंबित समस्या आणि माजी सैनिकांना होणाऱ्या गैरसोयींबाबत सविस्तर चर्चा करून निवेदन देण्यात आले. यापूर्वीही या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १३ ऑगस्ट २०२६ रोजी माजी सैनिकांच्या वतीने सैनिक निषेध मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही काही मागण्या प्रलंबित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ECHS पोलिक्लिनिकमधील CBC रक्त तपासणी मशीन गेल्या दीड वर्षापासून बंद असून ती अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. तसेच एम्पॅनल्ड हॉस्पिटलचा करार संपल्यानंतर तो अद्याप सुरू झालेला नसल्याने माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची गैरसोय होत असल्याचे सांगण्यात आले.
तसेच बाहेरील वरिष्ठ लष्करी अधिकारी ECHS पोलिक्लिनिकला भेट देत असताना त्याबाबत ECHS टेलिग्राम ग्रुपवर माहिती दिली जात नसल्याने माजी सैनिकांना अधिकाऱ्यांची भेट घेऊन समस्या मांडता येत नसल्याचा मुद्दाही प्रशांत कदम यांनी उपस्थित केला. ECHSच्या SOPनुसार दर महिन्याला माजी सैनिक व सैनिक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणे अपेक्षित असताना कराड पोलिक्लिनिकमध्ये गेल्या चार वर्षांत अशा बैठका झालेल्या नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे.
या विविध समस्यांबाबत १२ जुलै २०२६ पासून संरक्षण मंत्री, ECHS संचालक, स्टेशन कमांडर, JOC सब एरिया पुणे तसेच JOC दक्षिण कमांड पुणे यांच्याकडे निवेदने देण्यात आल्याची माहिती कमांडंट ब्रिगेडियर एम. एच. खडकी यांना देण्यात आली. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून प्रलंबित समस्या तातडीने मार्गी लावाव्यात, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी सैनिक फेडरेशनचे पदाधिकारी तसेच माजी सैनिक उपस्थित होते.

