दहिवडी पोलिसांची मोठी कारवाई; सहा चोरीचे गुन्हे उघडकीस ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने तीन आरोपी जेरबंद; तब्बल २ लाख ८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी, दि. १३ सप्टेंबर २०२६ :
माण तालुक्यातील मार्डी, आंधळी परिसरात शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाणबुडी विद्युत मोटारी चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले असताना दहिवडी पोलिसांनी ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने मोठी कारवाई करत चोरीचे तब्बल सहा गुन्हे उघडकीस आणले आहेत.

 या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून पाणबुडी विद्युत मोटारी, दागिने, गहू तसेच मोटारसायकल असा एकूण २ लाख ८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मार्डी, आंधळी परिसरातील वाढत्या मोटार चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर दहिवडी पोलीस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथक तसेच शिंगणापूर दूरक्षेत्राचे अंमलदार आरोपींचा शोध घेत होते. याचदरम्यान गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संशयितांना ग्राम सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने ताब्यात घेतले.

चौकशीत आरोपींनी साथीदारांच्या मदतीने मार्डी येथील पोळ, ढवळे व जळक यांच्या शेतातील तसेच बोडके येथील गोरे यांच्या विहिरीवरील पाणबुडी विद्युत मोटारी चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच मार्डी येथील राजमाने यांच्या घराला कोणी नसताना कुलूप तोडून घरफोडी केल्याचे आणि चव्हाण यांच्या घरासमोर उभी केलेली मोटारसायकल चोरी केल्याचेही तपासात समोर आले.

या प्रकरणी विशाल राजेंद्र चव्हाण (रा. मार्डी, ता. माण), अविनाश कुंडलिक चव्हाण (रा. मार्डी, ता. माण) आणि रोहित हणमंत चव्हाण (रा. मार्डी, ता. माण) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभाग कॅम्प वडूजचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे, पोलीस हवालदार सचिन जगताप, पोलीस कॉन्स्टेबल अजिनाथ नरबट, निलेश कुदळे, महेंद्र खाडे, संतोष विरकर, महेश सोनवलकर आणि सुधीर करचे यांनी सहभाग घेतला.

सदर गुन्ह्यांचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे आणि प्रकाश हांगे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *