वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिलेला दहिवडी पोलिसांनी पकडले; ४५ हजारांचे दागिने हस्तगत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

दहिवडी :प्रतिनिधी 

ऐकण्यास व बोलण्यास कमी येणाऱ्या ८५ वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या महिला आरोपीला दहिवडी पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्याकडून ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी हस्तगत करण्यात आले आहेत.

माण तालुक्यातील मार्डी येथे २९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रतन जगन्नाथ जळक (वय ८५) या वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील काळ्या मण्यांच्या माळेतील ३ ग्रॅम वजनाचे ३० षटकोनी सोन्याचे मणी अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. याप्रकरणी त्यांच्या सुनेने, सुशीला राजेंद्र जळक (वय ४०) यांनी दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली. त्यानंतर मार्डी येथील एका महिला आरोपीला ताब्यात घेऊन तिच्याकडून चोरीस गेलेले ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मणी हस्तगत केले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली कडूकर आणि दहिवडी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. दहिवडी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी, सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे, नंदकुमार खाडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष विरकर, महेश सोनवलकर आणि सुधीर करचे यांनी कारवाईत सहभाग घेतला.

या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक मोहन हांगे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *