शासकीय कर्तव्य बजावताना पोलिसाला टेम्पोने फरफटत नेले; दोघांविरुद्ध गुन्हा
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड :प्रतिनिधी
अवैध वाळू वाहतुकीच्या संशयावरून वाहनाची तपासणी करत असताना पोलिस कर्मचाऱ्याला टेम्पोला धरून फरफटत नेल्याची घटना म्हसवड परिसरात घडली. याप्रकरणी म्हसवड पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १८ सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास मेगासिटी ते बनगरवाडी-विरकरवाडी मार्गावर पोलीस कॉन्स्टेबल महावीर केराप्पा कोकरे हे शासकीय मोटारसायकलवरून संशयित वाहनांचा शोध घेत होते. यावेळी विनानंबरचा दुधी रंगाचा ४०७ टेम्पो संशयास्पदरीत्या जाताना दिसल्याने त्यांनी तो थांबवून तपासणी केली. टेम्पोमध्ये वाळू भरलेली आढळून आली. चालकाकडे वाळू वाहतुकीचा परवाना नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, टेम्पोमधील अवि अशोक तोरणे याने चालक प्रितम नवनाथ लोखंडे याला पोलिसाचे न ऐकता वाहन घेऊन पळून जाण्यास चिथावणी दिल्याचा आरोप आहे. त्यानंतर चालकाने वाहन सुरू करून वेगाने पुढे नेले. यावेळी पोलीस कर्मचारी कोकरे यांनी चालकाच्या बाजूचा दरवाजा पकडला असता त्यांना सुमारे ४०० ते ५०० मीटर फरफटत नेण्यात आले. यात त्यांच्या हाताला, पोटरीला, गुडघ्याला व घोट्याला दुखापत झाली असून शासकीय गणवेशही फाटला.
त्यानंतर चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तसेच टेम्पो रिव्हर्स घेऊन अंगावर घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, पोलिस कर्मचारी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला. त्यानंतर दोन्ही संशयित टेम्पो घेऊन म्हसवडच्या दिशेने पसार झाले.
जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर म्हसवड येथील संचित हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. या प्रकरणी प्रितम नवनाथ लोखंडे व अवि अशोक तोरणे यांच्याविरुद्ध म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६९/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास सपोनि संदिप पोमन यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.

