कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरली; उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू बार्शी तालुका पोलिसांत दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज
बार्शी : प्रतिनिधी
खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात असताना दुचाकीसमोर अचानक कुत्रे आडवे आल्याने दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या ३० वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल मधुकर ढेरे (वय ३६, रा. उपळाई ठोंगे) हे त्यांच्या ताब्यातील होंडा शाईन दुचाकी क्रमांक MH-13-FE-5699 वर मागे सुनिल पांडुरंग जाधव (वय ३०) यांना बसवून खांडवीहून उपळाई ठोंगेकडे जात होते. ८ सप्टेंबर रोजी पहाटे सुमारे २ वाजता लक्ष्मीआईच्या लहान मंदिराजवळ अचानक कुत्रे रस्त्यावर आल्याने दुचाकी थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी दुचाकी घसरून दोघेही रस्त्यावर पडले.

या अपघातात सुनिल जाधव यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना १० सप्टेंबर रोजी दुपारी ३.१६ वाजता त्यांचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीचेही सुमारे दोन हजार रुपयांचे नुकसान झाले.

या घटनेच्या तपासातून दुचाकी निष्काळजीपणे व वेगाने चालविल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय श्रीपती भालेराव यांच्या फिर्यादीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात प्रथम खबर नोंदणी क्र. ३०६/२०२६ अन्वये BNS कलम 281, 106(1), 324(4)(5) तसेच मोटार वाहन कायदा कलम 184 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास प्रभारी अधिकारी सपोनि अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने श्रेणी पोलीस उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *