शिक्षकांच्या प्रश्नांची टप्प्याटप्प्याने सोडवणूक करू : गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड : प्रतिनिधी
माण तालुक्यातील शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांची प्रशासनाच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सोडवणूक करण्यासाठी आवश्यक ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांनी दिली. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी सातत्याने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
माण तालुका शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे यांची पंचायत समितीत भेट घेऊन शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत निवेदन दिले. यावेळी शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली.
शिक्षकांची सेवापुस्तके अद्ययावत करणे, केंद्रनिहाय क्रीडा समन्वयकांचे नियोजन व पुनर्रचना, वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्तावांचा पाठपुरावा, खान अकॅडमीच्या कामकाजातील अडचणी, पटसंख्येनुसार करण्यात आलेल्या शिक्षक बदली व समायोजनातील प्रश्न, तसेच तालुका आदर्श शिक्षक पुरस्कार दरवर्षी नियमितपणे घेण्यात यावा, या मागण्यांवर चर्चा झाली. शिक्षकांना प्राप्तिकरासंदर्भात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी स्वतंत्र बैठक आयोजित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
शिक्षक समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष घोडके, सल्लागार राजेंद्र कदम, शिक्षक नेते रामदास जाधव, तालुका नेते काशिनाथ तोरणे, तालुकाध्यक्ष सूर्यकांत दडस, सरचिटणीस सुशील त्रिगुणे, शिक्षक बँक संचालक नितीन काळे, कार्याध्यक्ष अजित हिंगे, सातारा विभागीय उपाध्यक्ष महादेव महानवंर, उपाध्यक्ष विनोद शिलवंत, कोषाध्यक्ष नवनाथ खरात, महिला आघाडी कार्याध्यक्ष रत्नमाला पवार आदी उपस्थित होते.
शिक्षकांच्या विविध प्रश्नांची मांडणी सरचिटणीस सुशील त्रिगुणे यांनी केली. प्रशासनाशी सकारात्मक संवाद ठेवून शिक्षकांचे प्रश्न टप्प्याटप्प्याने मार्गी लावण्यासाठी शिक्षक समिती सातत्याने प्रयत्नशील राहील, असे तालुकाध्यक्ष सूर्यकांत दडस यांनी सांगितले.

