रस्तापुर येथे गाडी लावण्यावरून वाद; तरुणासह आईला मारहाण लोखंडी रॉड, काठी व चैनने हल्ला; सात आरोपींना अटक

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी : प्रतिनिधी

रस्तापुर (ता. बार्शी) येथे हनुमान मंदिराजवळ गाडी लावण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणासह त्याच्या आईला व नातेवाईकांना मारहाण केल्याची घटना १४ सप्टेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात सात आरोपींसह त्यांच्या इतर साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ऋषीकेश सुरेश मोहिते (वय २१, रा. रस्तापुर) हे हनुमान मंदिराजवळील कट्ट्याजवळ असताना आरोपी ओंकार रामलिंग बरबडे हा स्कॉर्पिओ वाहनातून तेथे आला. त्याच्यासोबत संदीप बिरमल मोहिते, किरण बिरमल मोहिते, परमेश्वर जयराम पालकर, सुरज हरिचंद्र देशमुख, विशाल बापुसाहेब बरबडे व अक्षय संतोष बरबडे यांच्यासह इतर साथीदार होते.

गाडी लावण्यावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ व दमदाटी केल्याचा आरोप आहे. त्यानंतर लोखंडी रॉड व काठीने मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात ऋषीकेश मोहिते यांच्या खांद्याला दुखापत झाली. त्यांना सोडविण्यासाठी आलेल्या आई ललिता मोहिते यांनाही मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच चुलते, चुलती व इतर नातेवाईकांनाही लाथाबुक्क्यांनी व काठीने मारहाण करून जखमी केल्याचा आरोप आहे.

घटनेदरम्यान आरोपींनी धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना दिलेल्या जबाबात नमूद केले आहे. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून वाहनातून निघून गेल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र. नं. ३०४/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९(२), १९१(२), १९१(३), १९० तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिरगिरे करीत आहेत.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *