उंब्रजमध्ये ध्वनी प्रदूषण व व्यसनमुक्तीसाठी जनजागृती रॅली

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते
उंब्रज : प्रतिनिधी

“ध्वनी प्रदूषण टाळा, डीजे-डॉल्बी नको; व्यसनमुक्त समाज, सुदृढ देश” या सामाजिक संदेशाला घेऊन उंब्रज येथे शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी महात्मा गांधी स्कूल व उंब्रज पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.

सण-उत्सवांच्या काळात वाढणारे ध्वनी प्रदूषण, डीजे-डॉल्बीचा कर्कश आवाज तसेच तरुणाईला विळखा घालणाऱ्या विविध व्यसनांपासून समाजाला दूर ठेवण्यासाठी या रॅलीतून प्रभावी जनजागृती करण्यात आली. “व्यसनाला नकार, आरोग्याला होकार”, “डीजे-डॉल्बी नको, शांतता हवी” अशा घोषवाक्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.

महात्मा गांधी स्कूलपासून सुरू झालेली रॅली माणिक चौक, धनलक्ष्मी मंदिर, शिवाजी पुतळा मार्गे अंधारवाडी रोड या मार्गाने काढण्यात आली. रॅलीमध्ये शाळेचे सुमारे ५०० विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच उंब्रज पोलीस ठाण्याचा पोलीस स्टाफ मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.

 

विद्यार्थ्यांच्या हातातील जनजागृती फलक, घोषवाक्ये आणि सामाजिक संदेशांमुळे उंब्रज शहरात रॅलीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. ध्वनी प्रदूषणामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांना होणारा त्रास टाळणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी केवळ पोलीस किंवा प्रशासनाचीच नव्हे, तर पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संपूर्ण समाजाची भूमिका महत्त्वाची आहे, याबाबतही विद्यार्थ्यांनी जनजागृती केली.

या उपक्रमासाठी महात्मा गांधी स्कूलचे मुख्याध्यापक वैभव उमरदंड सर यांचे विशेष सहकार्य लाभले. रॅलीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी उंब्रज पोलिसांकडून योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून दिलेला सामाजिक संदेश प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला, तरच ‘व्यसनमुक्त समाज आणि सुदृढ देश’ ही संकल्पना प्रत्यक्षात येईल, असा संदेश या जनजागृती रॅलीतून देण्यात आला.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *