ज्ञानबा-तुकाराम’च्या जयघोषात सिद्धनाथ हायस्कूलची बाल गोपाळ दिंडी; म्हसवड नगरी भक्तीरसात न्हाली
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित श्री सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेला ‘बाल गोपाळ दिंडी सोहळा’ भक्तिमय वातावरणात आणि उत्साहाच्या जल्लोषात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा निनाद, “ज्ञानबा-तुकाराम” आणि “ज्ञानेश्वर माऊली”च्या अखंड जयघोषाने संपूर्ण म्हसवड नगरी विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगून गेली.
वारी परंपरेचे संस्कार नव्या पिढीपर्यंत पोहोचावेत, विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, शिस्त आणि सामाजिक ऐक्याची भावना रुजावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या दिंडीत विद्यार्थ्यांनी वारकरी, विठ्ठल-रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला. त्यामुळे दिंडीचे स्वरूप अत्यंत आकर्षक आणि देखणे झाले होते.
शाळेच्या प्रांगणातून प्रारंभ झालेली दिंडी मेनपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महावीर चौक, सिद्धनाथ मंदिर चौक आणि यात्रा पटांगण मार्गे पुढे सरकली. श्री सिद्धनाथ मंदिर व यात्रा पटांगण येथे विद्यार्थ्यांनी सादर केलेला शिस्तबद्ध आणि नेत्रदीपक रिंगण सोहळा उपस्थित नागरिकांच्या विशेष पसंतीस उतरला. टाळांच्या ठेक्यावर आणि विठ्ठलनामाच्या गजरात विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून अनेकांनी दिंडीचे कौतुक केले. त्यानंतर बायपास मार्गे बसस्थानक चौकातून सातारा-पंढरपूर मार्गाने दिंडी पुन्हा शाळेत परतली.
दिंडीतील पालखीचे शहरातील नागरिकांनी विविध ठिकाणी स्वागत करून दर्शन घेतले. यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य ॲड. पृथ्वीराज राजेमाने यांनी दिंडीत सहभागी होत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले, तर माजी नगराध्यक्ष नितीन दोशी यांनी पालखीचे पूजन करून दर्शन घेतले.
दिंडीनंतर शाळेत भजन-कीर्तनाचा कार्यक्रम झाला. भक्तिरसाने भारावलेल्या वातावरणात विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्य प्रविण दासरे यांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख सर, म्हमाणे सर, भोते सर, माने सर, म्हेत्रे सर, सावंत सर, सरवदे सर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये वारकरी परंपरेबद्दल आत्मीयता निर्माण करणारा हा उपक्रम म्हसवड शहर आणि परिसरात सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला.

