क्रांतिवीर शैक्षणिक संकुलात ‘बाल दिंडी’चा भक्तिमय जल्लोष; नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षा यांच्या हस्ते पूजन
व्हिजन २४ तास न्यूज
म्हसवड | प्रतिनिधी
आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने क्रांतिवीर शैक्षणिक संकुल, म्हसवड येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्रांतिवीर बाल दिंडी’ सोहळ्याला भक्तिमय वातावरणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या दिंडीचे पूजन म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा सचिन वीरकर व उपनगराध्यक्षा श्रीदेवी निशांत पिसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

शालेय विद्यार्थ्यांना आषाढी वारीची परंपरा, वारकरी संप्रदायाचे संस्कार आणि भक्तीचा अनुभव मिळावा या उद्देशाने क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी प्राथमिक शाळा, आत्मगिरी विद्यालय व नूतन मराठी शाळेच्या संयुक्त विद्यमाने या बाल दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नगरसेवक अभिषेक वीरकर, नगरसेविका अरुणा गायकवाड, सचिन वीरकर, मुख्याध्यापिका सुलोचना बाबर, अनिल माने, पूनम जाधव, शिक्षक, पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतांच्या वेशभूषेत सजलेले विद्यार्थी, गळ्यात तुळशीमाळ, कपाळावर गंध, हातात टाळ-मृदुंग घेऊन “ज्ञानबा-तुकाराम”, “विठ्ठल… विठ्ठल…” अशा जयघोषात दिंडीत सहभागी झाले. भजन, फुगड्या, रिंगण, डोक्यावर तुळशी वृंदावन आणि विठ्ठल-रखुमाईच्या भक्तिमय गजराने संपूर्ण संकुल परिसर जणू ‘दुसरी पंढरी’ बनल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी भजन, कीर्तन, संतचरित्र कथन, पूजन व प्रसाद वाटपाचे कार्यक्रमही उत्साहात पार पडले. संकुलातील हजारो विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा सोहळा अधिकच रंगतदार ठरला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अध्यक्ष कृषिरत्न विश्वंभर बाबर यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालकांच्या सहकार्यामुळे हा भक्तिमय सोहळा अविस्मरणीय ठरला.

