देवापूर ग्रामपंचायतीकडे २५ लाखांची करथकबाकी; नागरी सुविधांवर परिणाम
व्हिजन २४ तास न्यूज
विशाल माने
देवापूर , प्रतिनिधी :
देवापूर ग्रामपंचायतीकडे घरपट्टी व पाणीपट्टीची तब्बल २५ लाख ७६ हजार ३८७ रुपयांची थकबाकी असून, त्यामुळे गावातील मूलभूत सुविधांवर परिणाम होत असल्याचे चित्र आहे.
ग्रामपंचायतीकडे घरपट्टीची १४ लाख ७५ हजार ६३४ रुपये तर पाणीपट्टीची ११ लाख ७५३ रुपये थकबाकी आहे. कर वसुली कमी झाल्याने ग्रामपंचायतीच्या आर्थिक स्थितीवर ताण निर्माण झाला असून स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा आणि इतर विकासकामांसाठी निधीची कमतरता भासत असल्याची चर्चा आहे. याचा फटका नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना बसत आहे.
गावातील अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले असून गटारे कचऱ्याने तुंबलेली आहेत. पावसाळ्यात गटारांचे पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांची वाढ, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे विविध आजारांचा धोका वाढला आहे.
गावातील बहुतांश पथदिवे बंद अवस्थेत असल्याने रात्री अंधाराचे साम्राज्य पसरते. वारंवार मागणी करूनही नवीन दिवे बसविणे किंवा बंद दिव्यांची दुरुस्ती होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.
देवापूर हे शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचे गाव मानले जाते. गावातील चौकाचौकात व मध्यवर्ती ठिकाणी बसविण्यात आलेले १७ सीसीटीव्ही कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याने विद्यार्थी व नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
पाणीपुरवठा व्यवस्थेचीही अवस्था बिकट झाली आहे. अनेक वॉल्व्ह गळतीग्रस्त असून जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. गावातील तिन्ही वॉर्डांतील गटारे दुर्लक्षित अवस्थेत असून स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
ग्रामपंचायतीतील अंतर्गत मतभेदांमुळे विकासकामांना गती मिळत नसल्याची चर्चा गावात आहे. त्यामुळे अनेक योजना आणि समित्या केवळ कागदोपत्री राहिल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
याबाबत गटविकास अधिकारी प्रदीप शेडगे यांनी नागरिकांनी घरपट्टी व पाणीपट्टी वेळेत भरून ग्रामविकासाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. एवढ्या मोठ्या थकबाकीबाबत चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
देवापूरसारख्या ऐतिहासिक व शैक्षणिक महत्त्व असलेल्या गावात मूलभूत सुविधांचा प्रश्न गंभीर बनत चालल्याने थकबाकी वसुली आणि विकासकामांबाबत प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

