अहिल्यादेवी जयंती स्थळाच्या संरक्षणासाठीचा लढा यशस्वी प्रशासनाकडून त्रिस्तरीय चौकशी समितीचे आश्वासन; आमरण उपोषण मागे

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

जांभुळणी, प्रतिनिधी :

मौजे जांभुळणी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सवाच्या पारंपरिक स्थळाचे संरक्षण, सदर जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्यासह ग्रामपंचायत कारभारातील कथित अनियमिततेची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आमरण उपोषणाला अखेर यश मिळाले आहे. गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दि. १ जूनपासून माणदेशी कवी दत्ता कोकरे आणि सामाजिक कार्यकर्ते सुनील काळे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाने परिसराचे लक्ष वेधून घेतले होते. गावाच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक अस्मितेशी निगडित असलेल्या या प्रश्नासाठी ग्रामस्थ, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दर्शविला. उपोषणस्थळी दररोज ग्रामस्थांची उपस्थिती राहिल्याने आंदोलनाला व्यापक लोकसमर्थन लाभले.

उपोषणादरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश करचे, प्रा. सचिन होनमाने, बाळराजे विरकर, सुभेदार छगन कोकरे, माजी सरपंच भास्कर काळे, विक्रम कोकरे, महावीर पुकळे, धनाजी पुकळे, ॲड. प्रविण कोकरे, अक्षय जानकर, सुरेश गोरड, शिवरामभाई मासाळ, पोलीस पाटील सुभाष काळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांना पाठिंबा दिला. तसेच म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी आंदोलन शांततेत आणि कायदेशीर मार्गाने पार पडण्यासाठी विशेष सहकार्य केले.

आज गटविकास अधिकारी प्रदीप शेंडगे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली. मागण्यांची गांभीर्याने दखल घेत संबंधित प्रकरणाच्या चौकशीसाठी त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर त्यांच्या हस्ते दत्ता कोकरे व सुनील काळे यांनी लिंबूपाणी प्राशन करून आपले आमरण उपोषण मागे घेतले.

यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव मंडळ, जांभुळणीच्या वतीने या आंदोलनाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणारे ग्रामस्थ, पत्रकार, विविध सामाजिक संघटना, अधिकारी-कर्मचारी आणि समाजबांधव यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

उपोषणकर्ते दत्ता कोकरे व सुनील काळे यांनी यावेळी सांगितले की, “गावाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी उभारलेला हा लोकशाही लढा जनतेच्या एकजुटीमुळे यशस्वी झाला आहे. प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतल्याने लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला असून भविष्यातही समाजहिताच्या प्रश्नांवर अशीच एकजूट कायम राहावी.”

या आंदोलनाच्या यशामुळे जांभुळणी परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासनाच्या आश्वासनानंतर आता चौकशी समितीच्या कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *