उंब्रज पोलिसांची तत्परता; सायबर फसवणुकीतील ₹82,500 अवघ्या काही तासांत परत

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

कुलदीप मोहिते 

उंब्रज (प्रतिनिधी):

उंब्रज पोलिसांनी तत्परता आणि तांत्रिक कौशल्याच्या बळावर सायबर फसवणुकीतील 82 हजार 500 रुपये अवघ्या काही तासांत फिर्यादीला परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

          उंब्रज येथील अनुज संजय नगाने हे ट्रान्सपोर्ट व्यवसायिक असून, 2 ऑगस्ट 2026 रोजी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करून पेट्रोल स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचे आमिष दाखवले. संबंधिताने व्हॉट्सअॅपवर स्कॅनर पाठवून त्याद्वारे पैसे भरण्यास सांगितले. आमिषाला बळी पडलेल्या अनुज नगाने यांनी टप्प्याटप्प्याने 82,500 रुपये पाठवले. मात्र पैसे मिळाल्यानंतर ना पेट्रोल देण्यात आले, ना रक्कम परत करण्यात आली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    तक्रार प्राप्त होताच उंब्रज पोलिसांनी तातडीने तांत्रिक तपास सुरू करून सातारा सायबर पोलिसांच्या मदतीने संबंधित बँक खात्यांशी संपर्क साधला आणि व्यवहार त्वरित फ्रीज करण्याची कारवाई केली. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून 100 टक्के म्हणजेच 82,500 रुपये फिर्यादीच्या बँक खात्यात परत जमा करण्यात आले.

या कारवाईबद्दल नागरिकांनी उंब्रज पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे.

      याप्रसंगी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वस्त दरात वस्तू देण्याचे आमिष, अनोळखी लिंक, QR कोड किंवा स्कॅनरद्वारे पैसे भरण्यापूर्वी खात्री करावी. कोणालाही OTP, PIN किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये. सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईनवर किंवा जवळच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम वैराट तसेच सातारा सायबर पोलीस ठाण्याच्या अधिकारी व अंमलदारांच्या सहकार्याने पार पडली.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *