बार्शीत सामाईक शेतजमिनीतील बोअरवरून दोन गटांत हाणामारी; चौघांविरुद्ध गुन्हा, परस्परविरोधी तक्रारी दाखल!

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

बार्शी | प्रतिनिधी

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे सामाईक शेतजमिनीमध्ये बोअरवेल घेण्याच्या कारणावरून दोन गटांत वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गुन्ह्यात चौघांविरुद्ध, तर दुसऱ्या गुन्ह्यात एका व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २५ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री कुसळंब येथील सामाईक शेती गट क्रमांक ३८४ च्या बांधावर बोअरवेल घेण्याच्या कारणावरून वाद झाला. शेतजमिनीची मोजणी करून घेतल्यानंतर बोअरवेल घ्यावी, असे सांगितल्याने वाद निर्माण झाल्याचे पहिल्या फिर्यादीत नमूद आहे.

पहिल्या गुन्ह्यात चौघांविरुद्ध आरोप

     संजय तुकाराम ठोंगे (वय ५३, रा. कुसळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, रस्तुम भाऊ ठोंगे, अनिकेत भास्कर ठोंगे, बाळासाहेब भाऊ ठोंगे (तिघे रा. कुसळंब) आणि तात्यासाहेब जनार्दन गात (रा. गाताचीवाडी) यांनी संगनमत करून लोखंडी फावडा व लोखंडी रॉडने मारहाण केल्याचा आरोप आहे. तसेच हाताने मारहाण, धक्काबुक्की, शिवीगाळ व दमदाटी करून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

      या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२ व ३(५) प्रमाणे दि. २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९.५५ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.

दुसऱ्या बाजूनेही तक्रार दाखल

     दरम्यान, रस्तुम भाऊ ठोंगे (वय ४६, रा. कुसळंब) यांनी जगदाळे मामा हॉस्पिटल, बार्शी येथे दिलेल्या जबाबानुसार, दि. २५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास सामाईक शेतजमिनीमध्ये बोअरवेलची व्यवस्था करीत असताना संजय तुकाराम ठोंगे हे हातात लोखंडी गज घेऊन आले. त्यांनी बोअरवेल घेऊ नको, असे सांगत शिवीगाळ करून डोक्यात व उजव्या पायावर लोखंडी गजाने मारहाण केली आणि जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

      या तक्रारीवरून बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३५३/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ३५१(२) व ३५२ प्रमाणे स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         या दोन्ही परस्परविरोधी तक्रारींच्या अनुषंगाने बार्शी तालुका पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

        पहिल्या गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल डुकळे यांच्याकडे, तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक काळेळ यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे नोंदीत नमूद आहे. दोन्ही बाजूंच्या तक्रारींवरून पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे नोंदवले असून, पुढील तपासात घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

       शेतातील बोअरवेलच्या कारणावरून सुरू झालेला वाद आता परस्परविरोधी पोलीस तक्रारींपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणातील पुढील तपासाकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

*टीप : वरील वृत्त पोलिसांकडून प्राप्त प्राथमिक तक्रारींच्या माहितीवर आधारित आहे. आरोपांची स्वतंत्र पडताळणी व न्यायालयीन निष्कर्ष अद्याप स्पष्ट नाहीत.*


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *