म्हसवडमध्ये मेंढ्या राखणाऱ्या महिलेचे मंगळसूत्र हिसकावले!     भाटकी येथील खंडोबा मंदिराजवळील घटना

बातमी Share करा:

व्हिजन २४ तास न्यूज 

म्हसवड : प्रतिनिधी
      माण तालुक्यातील भाटकी गावच्या हद्दीत फॉरेस्ट विभागाजवळ असलेल्या खंडोबा मंदिर परिसरात मेंढ्या राखणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून दोन अनोळखी इसमांनी पलायन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सुमारे  ६० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र  चोरीस गेले असून, याप्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रेश्मा सुभाष कोडलकर (वय ३६, रा. भाटकी, ता. माण, जि. सातारा) या २४ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास भाटकी गावच्या हद्दीतील खंडोबा मंदिराजवळ शेळ्या-मेंढ्या राखत होत्या. त्यावेळी माळशिरसच्या बाजूकडून भाटकी फाटामार्गे काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून अंदाजे २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन अनोळखी इसम त्यांच्या जवळ आले.

या दोघांपैकी मागे बसलेल्या इसमाने अचानक खाली उतरून महिलेचे नरडे धरले, तर दुसऱ्या इसमाने त्यांचे तोंड दाबले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याच्या दोन वाट्या आणि काळ्या मण्यांमध्ये गुंफलेले सुमारे ३० लहान सोन्याचे मणी असलेले, पाच ग्रॅम वजनाचे व अंदाजे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर दोघेही त्याच काळ्या मोटारसायकलवरून माळशिरसच्या दिशेने पळून गेले.

या प्रकरणी रेश्मा कोडलकर यांनी २९ ऑक्टोबर २०२६ रोजी म्हसवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३०६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

         या गुन्ह्याचा तपास म्हसवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. एस. शिंदे करीत आहेत. घटनेतील दोन्ही अनोळखी इसमांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.


बातमी Share करा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *